Premium

Video: “शरद पवारांवर राजकारणातही हीच परिस्थिती आली आहे”, निलेश राणेंनी शेअर केला १७ वर्षांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ!

निलेश राणेंनी २००६ मधील ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करून त्याआधारे आत्ताच्या घडामोडींमध्ये शरद पवारांना टोला लगावला आहे.

nilesh rane sharad pawar ricky ponting video
निलेश राणेंनी शेअर केला १७ वर्षांपूर्वीचा 'तो' व्हिडीओ! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या महिन्याभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आधी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातील उद्धव ठाकरेंबाबतच्या उल्लेखामुळे आणि नंतर त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे घडलेल्या घडामोडींमुळे चर्चेत राहिले आहेत. या अनुषंगाने सत्ताधारी भाजपाकडून शरद पवारांवर सातत्याने कधी खोचक तर कधी आक्रमक शब्दांमध्ये टीका केली जात आहे. विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही अशीच खिल्ली भाजपाकडून उडवली जाते. त्यातच आता भाजपा नेते निलेश राणे यांनी एक ट्वीट केलं असून त्यात तब्बल १७ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलंय ट्वीटमध्ये?

निलेश राणे हे सातत्याने महाविकास आघाडी आणि विशेषत: ठाकरे गटातील नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळतात. विशेषत: कोकणातील ठाकरे गटाचे नेते आणि राणे कुटुंबीय यांच्यात अनेकदा शाब्दिक टीकेचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो. अनेकदा जाहीर आव्हानं व प्रतिआव्हानंही दिली जातात. आता निलेश राणेंनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं असून त्यासाठी त्यांनी १७ वर्षांपूर्वीच्या या व्हिडीओचा आधार घेतला आहे. या व्हिडीओबरोबर निलेश राणेंनी “हीच परिस्थिती पवारसाहेबांची राजकारणातसुद्धा आली आहे”, असं ट्वीट केलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ १७ वर्षांपूर्वीचा म्हणजेच २००६ सालातला आहे. एका क्रिकेट सामन्यानंतरचा हा व्हिडीओ असून तेव्हा शरद पवार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे अध्यक्ष होते. त्यामुळे भारतात झालेल्या अनेक महत्त्वाच्या सामन्यांना शरद पवारांनी उपस्थिती लावली आहे. २००६ साली भारता पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला. यावेळीही शरद पवार उपस्थित होते. सामन्यानंतर बक्षीस वितरण खुद्द शरद पवारांच्याच हस्ते करण्यात आलं. तेव्हा घडलेल्या एका प्रसंगाचा संदर्भ निलेश राणे यांनी दिला आहे.

भाजपच्या वर्तनाने शिंदे गटातील अस्वस्थतेत भर; जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि सत्तेत असूनही कामे होत नसल्याने उघड नाराजी

…आणि पाँटिंगनं शरद पवारांना बाजूला जायला सांगितलं!

२००६ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईत पार पडला. ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला. सामन्यानंतर शरद पवारांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं. यावेळी विजेत्या संघाची ट्रॉफी हातात घेऊन शरद पवार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटिंगची वाट पाहात उभे होते. त्यावेळी रिकी पाँटिंगनं येऊन अक्षरश: शरद पवारांकडून ती ट्रॉफी ऐटीत मागितलीच. अर्थात, हे पाँटिंगनं मिश्किलपणे केल्याचं व्हिडीओवरून वाटत होतं. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघातल्या खेळाडूंनी ट्रॉफी घेऊन शरद पवारांना कॅमेऱ्यासमोरून बाजूला जायला सांगितलं. हा व्हिडीओ तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावरून क्रीडाविश्वाबरोबरच राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

निलेश राणेंचा टोला!

दरम्यान, या व्हिडिओसोबत निलेश राणेंनी “शरद पवारांची अशीच अवस्था राजकारणात झाली आहे” असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतच्या चर्चा, राष्ट्रीय राजकारणातील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं खुद्द शरद पवारांनीच स्पष्ट केल्यावरून हा टोला लगावल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 09:37 IST
Next Story
“अहो, आमचा सावरकरांच्या कार्यक्रमाला विरोध नाही, पण…”, ‘त्या’ प्रकारावर छगन भुजबळांचं टीकास्र; म्हणाले, “..याचं मला नवल वाटतंय!”