scorecardresearch

“आता स्वत: दाऊदनं फोन करून…”, निलेश राणेंचा राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक सवाल; नवाब मलिक प्रकरणावरून साधला निशाणा!

देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला देत नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

nilesh rane on nawab malik dawood ibrahim
भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक प्रकरणावरून निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्यावरील कारवाईवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचा आरोप करून भाजपानं नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. ईडीनं देखील याच प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली असून सध्या मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. या प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आल्यानंतर भाजपानं आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून टीका केल्यानंतर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी देखील खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

मलिक यांच्या सुटकेस न्यायालयाचा नकार

ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीनं केलेली अटक बेकायदेशीर असून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी मलिक यांनी याचिकेत केली होती. मात्र, आज न्यायालयानं मलिक यांची याचिका फेटाळून लावली आहे. “याचिका तपशीलवार ऐकायची असल्याने, तसेच याचिकेतील काही मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा आवश्यक असल्याने सुटकेचे अंतरिम आदेश काढता येणार नाहीत”, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तसेच, मलिक यांनी केलेली सुटकेची मागणी देखील फेटाळली आहे.

“…मग हे स्पष्ट होईल की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय”, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा!

या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी टविट करून खोचक टोला लगावला आहे. “मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता काय स्वत: दाऊदने फोन करून सांगावं राष्ट्रवादीवाल्यांना की त्यांचा राजीनामा घ्या?” असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

फडणवीसांचं टीकास्त्र

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकरावर टीकास्त्र सोडलं आहे. “कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होतात की नवाब मलिक यांच्याबद्दल उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. आज उच्च न्यायालयाने म्हटलं आहे की ईडीची कारवाई योग्य आहे. आता माझा सवाल आहे की बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि दाऊदच्या माणसासाबोत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणारे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? आता त्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp nilesh rane mocks thackeray government on nawab malik case pmw

ताज्या बातम्या