बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून काँग्रेस नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी यावरुन जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “आपली लायकी काय आहे हे शिवसेनेलाही माहिती नव्हतं, पण आम्हाला माहिती होती. स्वत:चा कचरा कसा करायचा यामध्ये शिवसेनेने पीएचडी केली आहे,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. निलेश राणे यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली असून त्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही असा टोला लगावला.

“शिवसेनेने जे काही २३ उमेदवार उभे केले होते त्यांचं फक्त डिपॉझिट जप्त झालेलं नाही तर त्यांच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झालं आहे. २३ पैकी १८ ठिकाणी नोटापेक्षा कमी मतदान झाल्याचं मला कळालं. ही शिवसेनेची लायकी त्यांना माहिती नव्हती, पण आम्हाला माहिती होती. एक तर स्वत:चा कचरा कसा करायचा यामध्ये शिवसेनेने पीएचडी केली आहे. गोव्यातही तसंच झालं. ज्या राज्यात शिवसेना निवडणुकीत उभी राहते तिथे आपटते. त्यांनी आता काहीतरी शिकावं, महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. लोकांची कामं करावीत. इकडे तिकडे स्वत:चा कचरा करुन घेण्यापेक्षा महाराष्ट्रात लक्ष द्या. एवढंच सांगू शकतो, नाही तर कचरा करण्याची त्यांची जुनी सवय आहे,” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

“शिवसेनेला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर पूर्वीचा काळ आठवला असेल जेव्हा संजय राऊत आम्ही अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यंमंत्रीपद मागितलं होतं तेव्हा त्यांनी कोणता पुरावा दिला होता? कुठे असं लिहिलं होतं? कोणामध्ये मीटिंग झाली होती? ज्या पक्षाचं डिपॉझिट झालं ते बोलणार. संजय राऊत स्वत: कधी निवडणुकीला उभे राहिले नाहीत, संजय राऊत यांना कोणावर बोलण्याचा अधिकार काय आहे,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना निलेश राणे यांनी म्हटलं की, “कोण आहे संजय राऊत?त्यांना आधी जनतेनून निवडून येण्यास सांगा, किमान नगसेवक पदासाठी निवडून येण्यास सांगा. काय किंमत आहे संजय राऊत यांची आणि ते देशाच्या राजकारणावर बोलणार. त्यांना गल्लीत कोण विचारत नाही. संजय राऊत आणि निवडणुकीचा काय संबंध? जे कधी एक निवडणूक जिंकले नाही तर निवडणुकांवर बोलणार”.