“नाणार प्रकल्प पुन्हा रत्नागिरीत आणण्यासाठी बैठका सुरु,” निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत होण्यासाठी प्रयत्न – निलेश राणे

नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. नाणार रायगडमध्ये होण्यासाठी चर्चा होत नसून तो राजापूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाने १४०० एकर जमिनीचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसंच नाणार रिफायनरी आणि बारसू एमआयडीसीमधील जमीन घोटाळ्यातील नावे जाहीर करणार असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. पण नाणारची एक कमिटी जी प्रोजेक्ट आणू पाहत आहे, ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत आहे. प्रकल्प रद्द झाला आहे तर मग ती चर्चा कशासाठी होत आहे ? प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी ही चर्चा होत नाही. राजापूरमध्ये प्रकल्प आणावा यासाठी ही चर्चा होत आहे. नाणार राजापूरमध्ये परत कसं आणलं जावं यासाठी एकत्र येऊन योजना आखली जात आहे,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

“नाणारमध्ये सुगी डेव्हलपर्स नावाची एक कंपनी असून निशांत देशमुख संचालकांपैकी एक आहेत. निशांत देशमुख मुख्यमंत्र्यांचा मावशीचा मुलगा आहे. त्याचा जवळपास १४०० एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. जमिनीच्या व्यवहारात मुख्यमंत्र्यांचाच नातेवाईक निघाला आणि युतीच्या काळात हे लोक मुखवटा घालून फिरत होते, लोकांना भडकवत होते. यांनी कुटुंबातील व्यक्ती जमिनीचा व्यवहार करत असताना यांनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनं केली,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

“नाणार प्रकल्प जाहीर झाल्यानंतर आम्ही काही जमीन घोटाळे समोर आणले होते. संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हेही दाखल झाले होते. आता तर सत्ता आली आहे. राजापूरला याच सरकारने एमआयडीसी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे हात जमिनीच्या लूटमारीमध्ये बरबटले आहेत,” असा आरोप निलेश राणे यांनी केला.

“मुख्यमंत्री आता आपले निशांत देशमुखसोबत संबंध नाही असं सांगू शकत नाहीत. त्यांचे कार्यक्रमांमधील एकत्र फोटो आहेत. जास्तीत जास्त व्यवहार परप्रांतीयांसोबत करण्यात आले असून १० टक्के स्थानिकही यामध्ये नाहीत,” असं निलेश राणे यांनी सांगितलं. यासोबत रुचा डेव्हलपर्सने ९०० एकरच्या जवळपास नाणारजवळ गुंतवणूक केली असल्याचं निलेश राणे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp nilesh rane press conference over nanar project shivsena maharashtra government sgy