शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. नितेश राणेंना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज होणारी सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. लता मंगेशकर यांचं निधन झाल्याने आज राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने न्यायालयाचं कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे आज सुनावणी होणार नाही. दरम्यान नितेश राणे यांना कोल्हापुरला नेण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना कोल्हापूरला नेलं जात आहे. रुग्णवाहिकेतून नितेश राणे यांना घेऊन पोलीस कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

काय आहे हे प्रकरण? सविस्तरपणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नितेश राणे यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्याच दिवसापासून छातीत दुखू लागलं होतं. रुग्णालयात योग्य ह्रदयरोगतज्ज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेतला होता. पण साखर कमी झाल्याने तसंच मणक्याचा त्रास यामुळे त्यांना तातडीने हलवण्यात आलं नव्हतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना कोल्हापूरला नेण्यात आलं असून कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नितेश राणे यांच्यासोबत पोलिसांचं आणि डॉक्टरांचं पथकही रवाना झालं आहे.

प्रकृती बिघडल्याने नितेश राणे रुग्णालयात दाखल

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयामध्ये आज म्हणजेच सोमवारी दुपारी दोन वाजल्यानंतर सुनावणी होणं अपेक्षित होतं. मात्र भारतरत्न लता मंगेशकर यांचं दु:खद निधन झाल्याने राज्य सरकारने दुखवटा जाहीर करत सुट्टीची घोषणा केलीय. राज्य सरकारशीसंबंधित सर्व कार्यालयांबरोबरच न्यायालयीन कामकाज आणि बँकांचं कामकाजही बंद राहणार आहे. या सुट्टीचा आणि कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फटका नितेश राणेंच्या या सुनावणीला बसला आहे.

सध्या नितेश राणे न्यायालयानी कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. आता मंगळवारी त्यांच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. तुरुंगामध्ये न जाता प्रकृती अवस्थेचं कारण देत नितेश राणे सिंधुदुर्ग रुग्णालयात दाखल झाले. आजची सुनावणी लांबल्याने त्यांचा मुक्काम वाढला आहे. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयामध्ये म्हणणं मांडण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केलेली. तेव्हा नितेश यांनी सुनावणी न्या. रोटे यांच्यासमोर नको अशी मागणी केली होती.

थेट गोव्यात नेऊन चौकशी…

नितेश राणे यांना पोलिसांनी गुरुवारी (३ फेब्रुवारी रोजी) गोव्यात नेऊन या गुन्ह्याच्या कटाबाबत चौकशी केली. सुमारे दीड महिन्याच्या कायदेविषयक लढाईनंतर नितेश यांना पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्यात बुधवारी संध्याकाळी पोलिसांना यश आल्यानंतर थेट गोव्यात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार नितेश यांना बुधवारी रात्रीच कणकवलीहून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत म्हणजे तब्बल पाच तास राणे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबतचा तपशील मिळू शकला नाही. या हल्लाप्रकरणी त्यांच्यावर कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitesh rane taken to kolhapur for medical treatment arrested in santosh parab attack case sgy
First published on: 07-02-2022 at 13:35 IST