“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती”; दिल्लीतल्या कार्यक्रमात गडकरींनी केला खुलासा

दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींना उलगडला दिल्लीत येण्याचा किस्सा

BJP, Nitin Gadkari,
दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींना उलगडला दिल्लीत येण्याचा किस्सा (File Photo: PTI)
दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती. अपघाताने आणि जबरदस्तीने दिल्लीत आलो असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी दिल्लीमध्ये येण्याचा किस्ला सांगितला.

“दिल्लीमध्ये मी अपघाताने आलो. मी येण्यासाठी तयार नव्हतो. जबरदस्तीने आलो. पण मराठी माणूस, मराठी संस्कृती. मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी इतिहास हा एकदम वेगळा आहे. मला कोणावर टीका करायची नाही, पण मराठी सारस्वाताचा आणि महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. महाराष्ट्र औद्योगिक तसंच साहित्य, संस्कृती, इतिहास या सर्व गोष्टींमध्ये पुढे आहे. संगीत, गाणं, चित्रपट सगळ्या बाबतीत मराठी माणसाचा दबबबा आहे. महाराष्ट्र अजून सुखी, समृद्ध. संपन्न, शक्तिशाली व्हावा, फक्त साधनांनी नाही तर साहित्य, संस्कृती, कला यांनीदेखल व्हावा असं स्वप्न आहे,” असं नितीन गडकरींनी यावेळी सांगितलं.

“मला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात,” दानवेंचा टोला

रावसाहेब दानवे यांनी यावेळी आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, पण तुम्ही नशीबवान आहात असं म्हणत भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला. “आपण केंद्रात मंत्री झालात. आता हा अनुभव वेगळाच आहे. आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली. मला ४२ वर्ष लागली पण तुम्ही सहा महिन्यात काम केलं. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम मंत्रिमंडळात कराल,” असं रावसाहेब दानवे भागवत कराडांचा उल्लेख करत म्हणाले.

“कपिल पाटीलदेखील मी नवीन आहे म्हणाले. तुम्ही सात वर्षात राज्यमंत्री झालात हे पण काही कमी नाही. मला ४२ वर्ष लागली. तुमच्यासारखे नशीबवान लोक सापडणं कठीण आहे,” असा मिश्कील टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp nitin gadkari says he was not interested in coming to delhi sgy

ताज्या बातम्या