Sharmila Thackeray on BJP latest reaction : राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, याअंतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांना फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. आगामी १९ जून रोजी शिवसेनेच्या स्थापनेला ६० वर्षे आणि २२ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकसंध शिवसेना फोडल्याच्या ऐतिहासिक घटनेला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत निशाणा साधला. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.
“विमानतळांच्या खर्चाचा हिशोब घेणार”
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “१२ वर्षांपूर्वी भाजप ज्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करत होती, त्या समस्यांवर आता कोणी चकार शब्दही काढत नाही. काल आमच्याकडे दादरचे एक ज्युवेलर आले होते. ते कोकणातील असून मराठी आहेत. त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सध्या बंद पडले आहे. आपल्या सर्वांच्या करांमधून (टॅक्स) गोळा झालेला पैसा खर्च करून ते विमानतळ बांधले गेले. या १२ वर्षांत देशात आणि राज्यात किती विमानतळे सुरू झाली आणि त्यातील किती बंद पडली, याची सविस्तर माहिती मी आता काढणार आहे.”
पुढे बोलताना त्यांनी वाढत्या विमानतळांवर आणि खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एक विमानतळ बांधायला साधारण ४० ते ५० हजार कोटी रुपयांचा खर्च येतो, असा दावा केला जातो. आता नवी मुंबईत विमानतळ झाले आहे; पुण्यात विमानतळ असूनही आता पुरंदरला नवीन विमानतळ होत आहे. मुळात एवढी हवाई दळणवळणाची गरज आहे कुठे?” असा सवाल त्यांनी केला.
वृक्षतोड आणि वाढत्या उकाड्यावरून सरकारला धारेवर धरले
यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या वृक्षतोडीवरूनही सरकारला धारेवर धरले. “आम्ही वृक्षारोपण करत असलो, तरीही ही झाडे मोठी व्हायला १०० वर्षे लागतात. परंतु, येथे १००-२०० वर्षे जुनी असलेली झाडे सर्रास कापली जात आहेत. परिणामी उकाडा वाढत असून पाऊसही लांबला आहे. या सत्ताधाऱ्यांनी स्वतःची मुले तर परदेशात (फॉरेनला) सेटल केली आहेत, मग इथल्या पर्यावरणाचे त्यांना काय पडले आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
दुसऱ्यांचे ‘पक्ष फोडण्या’च्या राजकारणावर टीका
पत्रकारांनी ‘ऑपरेशन टायगर’विषयी विचारले असता शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “त्यांना (सत्ताधाऱ्यांना) फक्त पक्ष फोडण्याचीच कामे करायची आहेत. दुसऱ्यांची मुले (कार्यकर्ते) चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसमध्ये अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणारी चांगली मुले आहेत, त्यांना संधी का दिली जात नाही? त्यांनी फक्त आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? त्यांनी तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इथे उद्धव ठाकरेंचा फोडला, शरद पवारांचा पक्ष फोडला. आम्ही कधीही कोणाचा पक्ष फोडला नाही; उलट आम्ही आमची नवीन नेतृत्वे, नवीन मुले निर्माण केली. पक्षात जी चांगली मुले असतात, त्यांना तुम्ही मोठे केले पाहिजे.”
मातोश्रीच्या बैठकीतील खासदारांच्या गैरहजेरीवर भाष्य
शिवसेनेच्या (उबाठा) ‘मातोश्री’वरील बैठकीला काही खासदार गैरहजर असल्याच्या मुद्द्यावर बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “प्रत्येकाच्या घरी काही ना काही वैयक्तिक कार्यक्रम असू शकतात. पाच खासदार गैरहजर होते म्हणजे ते पक्ष सोडून गेले असा त्याचा अर्थ होत नाही; आणि जे बैठकीला हजर होते, ते कधीच जाणार नाहीत असेही सांगता येत नाही. मला याचा चांगला अनुभव आहे. माझ्या स्वतःच्या पक्षातील लोक जेव्हा जाणार असतात, तेव्हा मी फोन केल्यावर म्हणतात, ‘वहिनी, मी इथेच आहे’ आणि असे बोलून दुसऱ्याच मिनिटाला ते दुसऱ्या पक्षात गेलेले असतात.”
शेवटी सत्ताधाऱ्यांना आव्हान देताना त्या म्हणाल्या, “तुम्ही गेली १२ वर्षे सत्तेत आहात, मग आता स्वतःचे आमदार-खासदार निर्माण करून दाखवा. तेवढी हिंमत तरी दाखवा. तुम्ही देशाची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे; किमान तुमच्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना तरी मोठे करा.”
