बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांची २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची कोर्टाकडून सुटका करण्यात आली. करूणा शर्मा प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक ट्विट करत अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो असं म्हटलं होतं. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो, आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताचं राजकारण सभ्य म्हणायला नकोसं वाटतं,” असं पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं.

तसंच यावेळी त्यांनी तुम्ही करुणा शर्मा प्रकरणाकडे कोणत्या नजरेने पाहता असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “मी अशा कोणत्याही प्रकरणाकडे अनादर याच नजरेनेच पाहते. कोणीवरही अशा घटनांना सामोरं जाण्याची वेळ येऊ नये. पण अशी वेळ का येते हे मी सांगू शकत नाही कारण मी त्याचा भाग नाही”. यावेळी त्यांनी यासंबंधी धनंजय मुंडे यांच्याशी काहीही चर्चा केली नसल्याचंही सांगितलं.

पंकजा मुंडेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं होतं –

“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत, हा विश्वास हरवू नये. wrong Precedent should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची.” असं पंकजा मुंडे यांनी ट्विद्वारे म्हटलं होतं.

“बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे”


पंकजा मुंडे यांनी यावेळी राज्यातील बलात्काराच्या घटनांवरही भाष्य केलं. “आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान देण्यात आलं आहे. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाष्य करत आहे. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेचं प्रमाण वाढावं, त्यातही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचं जे चित्र आहे ते थोडंसं विदारक दिसत आहे,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. या घटना मनाला सुन्न करणाऱ्या आणि संताप आणणाऱ्या असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो पण खरं काम पोलिसांचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत जेणेकरुन आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याचा आणि त्रास देण्याचा, वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pankaja munde karuna sharma ncp dhanankay munde sgy
First published on: 24-09-2021 at 14:39 IST