“मी अजिबात नाराज नाही, पण…”, मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

पंकजा मुंडे म्हणतात, “मी मंत्री असताना सुद्धा खूप संघर्ष केला आहे. किती आरोपांना सामोरे गेले. किती संघर्षांना सामोरे गेले. मंत्री असताना माझा एक दिवस सुखाचा बघितला आहे का तुम्ही?”

“मी अजिबात नाराज नाही, पण…”, मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!
पंकजा मुंडेंनी दिलं नारीजीबाबत स्पष्टीकरण!

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर ज्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे, त्या खातेवाटपावरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यामध्ये पंकजा मुंडेंचा समावेश नसल्यामुळे त्यातून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात एकीकडे मित्रपक्षांतून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, याचवेळी आपल्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज असल्याचं मात्र त्यांनी नमूद केलं आहे.

पात्रता नसल्याच्या विधानाचीही जोरदार चर्चा

पंकजा मुंडेंनी दोन दिवसांपूर्व पात्रतेच्या मुद्द्यावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्या मंत्रीपदावरून जोरदार चर्चा रंगली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महादेव जानकर यांना राखी बांधल्यानंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांशी बोलताना आपल्या मंत्रीपदाविषयी सूचक टिप्पणी केली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या.

“मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

दरम्यान, यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यासंदर्भात आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं असून आपण नाराज नसल्याचं त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत. “मी नाराज आहे असं काहीही नाही. मी नाराज कशामुळे होणार? उगीचच नाराज नाराज म्हणायचं. पण माझे कार्यकर्ते नाराज आहे हे खरं आहे. त्यांनी ती नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यांना मी शांत केलं आहे. त्यांना दु:ख वाटत असेल. पण ते दु:ख वाटणारच. ते साहजिक आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल”, पंकजा मुंडेंची मंत्रीपद न मिळण्यावर सूचक प्रतिक्रिया!

“नाराजी शब्द काढून टाका”

दरम्यान, नाराजी हा शब्दच काढून टाका, अशी विनंती त्यांनी यावेळी केली. “माझी विनंती आहे की नाराजी हा शब्द बाजूला करा. कार्यकर्त्यांना आवड असते की आपला नेता मोठा व्हावा. आपल्या नेत्याला कमी मिळतं, तेव्हा प्रतिक्रिया देतात कार्यकर्ते. त्यात नाराजी कसली आहे? ती लोकांची अपेक्षा असते”, असं त्या म्हणाल्या.

“मंत्री असतानाही माझा एक दिवस सुखाचा नव्हता”

दरम्यान, आपला संघर्ष सुरूच राहणार असल्याच्या त्यांच्या विधानाबाबत माध्यमांनी विचारणा केली असता आपण कायम संघर्ष करत आल्याचं त्या म्हणाल्या. “मी मंत्री असताना सुद्धा खूप संघर्ष केला आहे. किती आरोपांना सामोरे गेले. किती संघर्षांना सामोरे गेले. मंत्री असताना माझा एक दिवस सुखाचा बघितला आहे का तुम्ही? हा संघर्ष कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर प्रवृत्तीविरुद्ध आहे. हा संघर्ष माझा सुरूच राहणार आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

Live Updates

Web Title: Bjp pankaja munde on cabinet expansion minister portfolio pmw

Next Story
शिंदे समर्थक आमदाराचं उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘त्या’ खळबळजनक पोस्टबाबत स्पष्टीकरण; म्हणाले, “ते मार्च महिन्यात…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी