भाजपाला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

“भाजपाच्या संस्कृतीत ‘मी’पणा मान्यच नाही,” पंकजा मुंडेंनी मांडलं स्पष्ट मत

Pankaja Munde, BJP Pankaja Munde
"भाजपाच्या संस्कृतीत 'मी'पणा मान्यच नाही," पंकजा मुंडेंनी मांडलं स्पष्ट मत

भाजपाला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही. आमच्या संस्कृतीला ‘मी’पणा अमान्य आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा असणं योग्य होतं असंही सांगितलं.

“टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहिती नाही. पण हे भाजपाला मान्य नाही. भाजपाला देश प्रथम, नंतर राष्ट्र आणि नंतर मी. भाजपात ‘मी’पणा मान्यच नाही. आपण, आम्ही असं म्हणणं मान्य आहे. त्यामुळे अशी कोणती टीम असणं पक्षाला मान्य असेल असं वाटत नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

“पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे”

“मी भाजपाच्या संस्कृतीचा सन्मान करणारी कार्यकर्ता आहे. मी कोणती मंत्री नाही, मी कोणत्या पदावर नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा माझ्या वडिलांनी मला संस्कारात दिली आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

मी नाराज नाही

“आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचं कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या….

“मी भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्याने त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केलं म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद गेलं असं म्हटलं असून हे हास्यास्पद आहे,” असंही यावेळी त्या म्हणाल्या.

रात्री १२.३० वाजता भागवत कराड यांचा फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो आहे अशी माहिती त्यांनी दिली होती असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. माझे लोकांशी नातं आहे, संबंध नाही. नातं कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचं प्रेम असल्याने ते व्यक्त होत असतात असं यावेळी त्या म्हणाल्या.

प्रीतम मुंडेंना संधी मिळायला हवी होती का ?

“भाजपामध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही, त्यांच्यात काही गुण असू शकतात जे पक्षासाठी भविष्यात फायद्याचे ठरु शकतात. त्यामुळे हरकत असण्याचं कारण नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

प्रीतम मुंडे यांचं नाव योग्य होतं

“जे मत असतं ते वैयक्तीक असतं. ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं. प्रीतम मुंडे यांचं नाव होतं आणि ते योग्य होतं. त्या विक्रमी मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी छान काम केलं, खूप हुशार आहेत. सर्व बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम डावललेला नाही. तरुण आहेत, बहुजन चेहरा आहेत. म्हणून त्यांचं नाव न येण्यासारखं काही नाही. केवळ प्रीतम ताईंचंच नाव आलं नाही असं नाही. चर्चा नावाच्या वलयामुळे होत आहे,” असं यावेळी त्या म्हणाल्या.

“पक्षाचे निर्णय पटण्याचा विषय नाही. कारण पक्षाने मला फॉर्म भरायला लावला तेव्हाही मी पात्र आहे का असं विचारलं होतं. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं होतं. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात अंतिम सत्य आहे. त्यामुळे निर्णय पटणं आणि न पटणं हा प्रश्न नसतो,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

“पंकजा मुंडेचं राजकारण खतम करण्याचा डाव आहे”

सामनामध्ये पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असं म्हणण्यात आलं आहे यासंबंधी विचारण्यात आलं असता, “मला वाटत नाही भाजपाला मला संपवायचं आहे. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिलंय ते वाचलं नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देईन,” असं म्हटलं.

गोपीनाथ मुंडेंनी बसवलेली घडी विस्कटू नये माझी जबाबदारी

मुंढेंना पर्याय म्हणून कराडांना पुढे केलं जातं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी राजकारणात व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिखरलेल्या संतप्त समाजाला एका ठिकाणी आणणं माझ्यासाठी आव्हान होतं. मुंढेंनी बसवलेली घडी विस्कटू नये माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्यातील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp pankaja munde press conference team devendra team narendra modi cabinet reshuffle sgy