मुंबई : देशात वाजपेयी सरकार असतानाही विरोधकांचा सन्मान केला जात होता, संसदेत कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही पण सध्या विरोधकांना संपवण्याचे काम होत आहे. राजकीय प्रतिशोध सुरु आहे आणि यातून देशात भयानक संकट उभे ठाकले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याची घेतलेली भूमिका योग्यच आहे. कारण देशावर आलेल्या संकटातून मोदी सरकार बाहेर काढू शकत नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अर्थशास्त्र विभाग व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या विकासदाराचे आकडे चुकीचे असल्याचा दावा केला.

भारताचा विकास दर ७.७ टक्के आहे हे ते सांगत आहेत पण सत्य वेगळे आहे. या आकड्यावर अनेक अर्थतज्ञ शंका उपस्थित करतात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या आकड्यांवर शंका उपस्थित करून भारताला ‘सी’ ग्रेड मध्ये टाकले आहे आणि भारताचे आकडे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असे स्पष्ट सुनावले आहे. विशेष म्हणजे ब्राझील व दक्षिण आफ्रिका यांचाही नंबर ‘ए’ ग्रेड मध्ये आहे. गुंतवणूक वाढली तरच विकास दर वाढेल पण मागील १२ वर्षात गुंतवणूक ही जीडीपीच्या ३२ टक्क्यांच्या आसपास आहे, त्यात वाढ झालेली दिसत नाही, त्याच्या आधारे विकास दर ६ ते ६.५ टक्के होतो. सरकारने मांडलेले आकडे साफ चुकीचे आहेत. २०४७ मध्ये भारत विकसीत देश होईल असे मोदी सांगत आहेत पण त्यासाठी आपला विकासाचा दर हा ८ टक्क्यांच्या वर असला पाहिजे आणि सध्याचे आकडे पाहता ते उदिष्ट गाठता येणे फारच कठीण असल्याचे सिन्हा म्हणाले.

भारताने याआधी अनेक मोठ्या संकटाचा सामना केला आहे आणि त्यातून देश पुन्हा ताकदीने उभा राहिला आहे. पंडित जवाहलाल नेहरु ते अटलबिहारी वाजपेयीपर्यंत सर्वच सरकारांनी संकटाचा मुकाबला केला पण सध्याच्या मोदी सरकारमध्ये संकटाचा मुकाबला करण्याची इच्छाशक्तीच नसल्याची टीका त्यांनी केली. या चर्चासत्रात ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अरुणकुमार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार व नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खा. कुमार केतकर आदी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होते.

अर्थतज्ञ प्रा. अरूणकुमार यांनी मोदी सरकार सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे लपवत असल्याचे सांगितले. देशातील असंघटीत क्षेत्र खूप मोठे आहे. छोटे, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. नोटबंदीचा मोठा फटका एमएसएमई क्षेत्राला बसला. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला, त्याचा फटकाही असंघटीत क्षेत्राला बसला. संघटीत क्षेत्राला मात्र त्याचा फायदा होत आहे. १० हजार रुपयांपेक्षा कमी कमाई असलेल्या कामगारांची संख्या असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. एवढ्या कमाईत व वाढलेल्या महागाईत तो कसा जगेल. महागाईचा दर सुद्धा संघटीत व असंघटीत क्षेत्रात वेगवेगळा आहे, गरीबांचे आकडे दाखविले जात नाहीत. गरीब माणूस पिचला जात आहे. आपले मार्केट घसरत आहे. आपली पिछेहाट होत असल्याचा दावा त्यांनी केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांनी केले. पाहुण्यांची ओळख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली. आभारप्रदर्शन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन देसाई यांनी केले.