साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून वगळण्याचा निर्णय

सांगली : भाजपची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेत शुक्रवारी काँग्रेसच्या गटनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे कौतुक करून अभिनंदनाचा ठराव मांडला. ‘एफआरपी’हून अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून सूट देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल काँग्रेसचे गटनेते जितेंद्र पाटील यांनी मांडलेल्या ठरावावर राष्ट्रवादीचे संजीव पाटील यांनी अनुमोदन दिले.

अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा पार पडली. चर्चेदरम्यान, साखर कारखान्यांना प्राप्तिकरात सूट देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांचा निर्णय ऊस उत्पादकांच्या फायद्याचा आहे, असे सांगत श्री. पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. याला सर्व सभागृहाने मंजुरी दिली.

जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नव्वद लाख रुपयांची तरतूद केली. मात्र सव्वावर्ष झाले तरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कामही सुरू करता आले नाही. यावरून जिल्हा परिषद उपाध्यक्षांना धारेवर धरत राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी कचरे, सतीश पवार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी तरतूद केलेले पैसै अन्यत्र वळवण्याची आक्रमकपणे मागणी केली. मात्र शिवसेनेचे सदस्य सुहास बाबर व भाजपचे संपतराव देशमुख यांनी कडाडून विरोध करत निधी वळवण्याचा डाव हाणून पाडला.

पंचायत समिती सभापतींनाही स्वीय निधी मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मात्र ती फेटाळण्यात आली. आटपाडी तालुक्यात शेटफळे येथील ग्रामसेवकावर अपहाराचा आरोप असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आपणास नसल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यात आपण कमी पडत असल्याची स्पष्ट कबुली दिली.