“गाल सर्वांनाच रंगवता येतात,” रुपाली चाकणकरांच्या ‘त्या’ टीकेला प्रवीण दरेकरांनी दिलं उत्तर

“राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल रंगवून दाखवू शकतं”, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. त्यानंतर आता…

BJP Praveen Darekar Replied NCP Rupali Chakankar Criticism gst 97
रुपाली चाकणकरांच्या टीकेनंतर दरेकर म्हणाले, "गाल सर्वांनाच रंगवता येतात."

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. आता चाकणकर यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. “मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. कारण, अशा वक्तव्यांमुळेच त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. पण गाल सर्वांनाच रंगवता येतात. अतिरेकी भाषा करू नये”, असा इशारा दरेकर यांनी रुपाली चाकणकर यांना दिला आहे. यामुळे आता हा वाद आणखी चघळणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

प्रवीण दरेकर यांच्या संबंधित विधानानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. रुपाली चाकणकर यांनी देखील कडक शब्दांत टीका केली होती. त्यावर आज (१४ सप्टेंबर) बोलताना प्रवीण दरेकर यांनी देखील टोकाची प्रतिक्रिया दिली आहे. “मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. कारण अशा वक्तव्यांमुळेच त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. पण गाल सर्वांनाच रंगवता येतात. त्यामुळे, कुणीही अतिरेकी भाषा करु नये. हे योग्य नाही. मी जे म्हणालो होतो ती केवळ मराठीतील एक म्हण आहे”, असं दरेकर म्हणाले. त्याचप्रमाणे, “वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार आहे, दुसरं काही नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझं वक्तव्यं नीट ऐका”, असंही दरेकर यांनी यावेळी म्हणाले.

कलाकारांवर टीका करतेवेळी थोडं तरी तारतम्य बाळगा, दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रिया बेर्डेंचा संताप

दरेकरांचं विधान नेमकं काय?

सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकरांनी नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे”, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली होती. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दरेकर बोलत होते.

प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चंद्रकांत पाटलांकडून पाठराखण; म्हणाले, “ते बोलीभाषेतलं…”

काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?

रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांच्या या टीकेला उत्तर दिलं आहे. “आपल्या बोलण्यातून दिसणारं वैचारिक दारिद्र्य संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp praveen darekar replied ncp rupali chakankar criticism gst

ताज्या बातम्या