आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. आधी ट्विटरवर आणि आज सकाळी पत्रकार परिषदेत देखील नवाब मलिक यांनी हा आरोप केल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात बोलताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधताना नवाब मलिक यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मराठीत म्हण, खाई त्याला खवखवे”

प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना मराठीतील एका म्हणीची आठवण नवाब मलिक यांना करून दिली आहे. “मराठीत एक म्हण आहे, खाई त्याला खवखवे. नवाब मलिक यांनी आधी काही कृत्य करून ठेवली असतील. त्याची त्यांना जाणीव झाली असेल. त्या कृत्यांच्या आधारेच आपलाही अनिल देशमुख होईल की काय, अशी भिती त्यांना वाटतेय. उद्या घडू शकणाऱ्या संभाव्य गोष्टींसाठी आत्तापासूनच मैदान तयार करून ठेवणं, अशी कुटिल नीती नवाब मलिक यांच्या वक्तव्यातून दिसत आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

“नवाब मलिक स्वत:च्याच आखाड्यात लोळतायत”

दरम्यान, सोशल मीडियाचा वापर आपण भाजपाकडून आणि पंतप्रधान नवाब मलिक यांच्याकडूनच शिकल्याची टीका नवाब मलिक यांनी केली होती. “हा आखाडा तुम्हीच तयार केला आहे. आता त्यातले पैलवान तुमच्यापेक्षा वरचढ झाले, तर तुम्ही म्हणता सोशल मीडियावर का येता?” असा खोचक सवाल देखील नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर देखील प्रविण दरेकरांनी प्रतीटोला लगावला आहे.

“नवाब मलिक यांनीच एक आखाडा तयार करून ठेवला आहे. त्या आखाड्यात ते स्वत:च लोळतायत. दुसरा कुणी त्यांच्यासोबत कुस्ती खेळायलाही येत नाही. या सर्व गोष्टी, त्यांचे बिनबुडाचे आरोप, त्यांच्या बाष्कळ चर्चा, वक्तव्य, कोर्टानंही त्यांना ट्वीट किंवा आरोप न करण्याचे निर्देश दिले आहेत. पण तरी ते थांबायला तयार नाहीत. आपल्याला कोंडीत पकडलं जाईल याची भिती असल्यामुळेच ते पाळत ठेवली जात असल्याचं चित्र उभं करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pravin darekar mocks nawab malik on recce claims social media use pmw
First published on: 27-11-2021 at 12:31 IST