काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर त्यावरून बरंच राजकारण पेटलेलं दिसून येत आहे. पण हे राजकारण सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं नसून सत्ताधाऱ्यांमध्येच या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या सर्व प्रकारावर टीका झाली नाही तरच नवल. काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या स्वबळाच्या भाषेनंतर आता विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून त्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये स्वबळाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादावर खोचक टीका करतानाच सरकारला कानपिचक्या देखील दिल्या आहेत. लोणावळ्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने ते बोलत होते.

तुमच्या स्वबळाचं जनतेला देणंघेणं नाही

प्रविण दरेकर यांनी राज्यातली परिस्थिती सांगताना सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे. “शेतकऱ्याचा माल विकला जात नाही. पीकविमा मिळाला नाही. शेतकरी हतबल झालाय. त्याच्या हातात बळ नाही. बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तुमच्या स्वबळाचं राज्यातल्या कामगारांना, जनतेला देणं-घेणं नाही. आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता बघत आहे. पण यांना त्याचं काही पडलेलं नाही”, असं दरेकर म्हणाले.

 

यांना लाजही वाटत नाही

दरम्यान, यावेळी बोलताना प्रविण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “यांना केवळ आपलं सरकार कसं टिकेल याची चिंता आहे. हे एकमेकांना शिव्या देखील देतात आणि एकमेकांसोबत नांदतायत पण. म्हणजे आज शिव्या द्यायच्या, संध्याकाळी भेटायचं, उद्या पुन्हा वेगळं बोलायचं. लाज-शरम काहीच वाटत नाही. तुम्ही स्वबळाचं, तुमच्या बळाचं काय करायचं ते करा. पण जर अशा पद्धतीने राज्याच्या जनतेचा छळ झाला आणि त्यांच्याच हातात बळ राहिलं नाही, तर ही जनता तुम्हाला पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत दरेकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.