“माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे, त्यांनी…”, प्रविण दरेकरांनी पत्रकार परिषदेत साधला निशाणा!

भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

pravin darekar on sanjay raut
प्रविण दरेकरांची संजय राऊतांवर टीका

शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा हा उपऱ्यांचा पक्ष झाल्याची टीका संजय राऊतांनी केली. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या तपासाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, उपऱ्यांसंदर्भात राऊतांनी केलेल्या टीकेवर दरेकरांनी थेट आव्हान दिलं आहे.

“राऊतांचा पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न”

“महाविकासआघाडी सरकारची नाचक्की होत आहे. त्यामुळे खुद्द शरद पवारांनाही रोज झालेल्या त्याच त्याच विषयांसाठी पत्रकार परिषदा घ्याव्या लागत आहेत. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांच चर्चा करून चोथा झालेल्या ईडी, सीबीआय यंत्रणांच्या गैरवापराची ढोलकी वाजवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

“जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेची काळजी करू नका”

“कलम ३७०विषयी कलम हटवूनही जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा होऊ शकली नाही, असं संजय राऊत म्हणाले. एकीकडे ते म्हणतात कलम ३७० हटवल्याचा आम्हाला अभिमान आहे. मग ते कलम काढलं ही चूक झाली का? तुम्ही जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेची काळजी करू नका. देशाचे गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. चीनी आक्रमण, काश्मीरची सुरक्षा, सर्जिकल स्ट्राईकसारखी टोकाची कारवाई करण्याची धमक असल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे”, असं दरेकर म्हणाले.

“आजची शिवसेना उपऱ्यांचं वर्चस्व असणारी”

दरम्यान, भाजपा उपऱ्यांचा पक्ष झाल्याची टीका संजय राऊतांनी केल्यानंतर त्यावर प्रविण दरेकरांनी प्रतिहल्ला चढवला आहे. “माझं संजय राऊतांना थेट आव्हान आहे. आपण आपल्या पक्षात असणारी उपऱ्यांची संख्या आणि भाजपामध्ये असलेल्या उपऱ्यांची संख्या याची आकडेवारी जनतेसमोर येऊ द्या. आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांचं वर्चस्व असणारी आहे. उदय सामंत मूळचे शिवसैनिक आहेत का? अब्दुल सत्तार १९६६ चे सैनिक आहेत का? शंकरराव गडाख कधी झाले शिवसैनिक? प्रियांका चतुर्वेदी खासदार आहेत, उर्मिला मातोंडकर कोण आहेत? अर्ध मंत्रिमंडळ उपऱ्यांचं भरलेलं असताना व्यापारी प्रवृत्तीला महत्त्व येत असताना भाजपावर उपऱ्यांना घेता असा आरोप करणं किती संयुक्तिक आहे?”, असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

भाजपा नेत्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्यानेच…; फडणवीस, चंद्रकांत पाटलांबरोबरच मोदी सरकारवरही शिवसेनेची टीका

“…तर आम्ही राऊतांचं अभिनंदन करू”

“राऊतांना माझी विनंती आहे, की महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षा, खून, आत्महत्या अशा घटनांविषयी राज्य सरकारला सल्ला देऊन काही कारवाई झाली, तर आपलं अभिनंदन आम्ही करू. अत्यंत खालच्या पातळीवर कधी नव्हे अशी टीका सुरू आहे. आमचे नेते गांजा घेतात की काय इथपर्यंत टीकेची पातळी गेली आहे. मला सांगायचंय की ड्रग्ज, गांजा यांची बाजू कोण घेतं, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. कुणाचे जावई अटकेत गेले, हेही महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या समर्थनात कोण आहे आणि कोण कारवाईच्या बाजूने आहे हे महाराष्ट्र पाहातो आहे”, असं दरेकर म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp pravin darekar slams shivsena sanjay raut on allegations pmw

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या