scorecardresearch

“आगामी निवडणुकीत..,” प्रदेशाध्य़क्षपदाची जबाबदारी मिळताच बावनकुळेंनी सांगितला भाजपाचा ‘फ्यूचर प्लॅन,’ म्हणाले…

एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे.

“आगामी निवडणुकीत..,” प्रदेशाध्य़क्षपदाची जबाबदारी मिळताच बावनकुळेंनी सांगितला भाजपाचा ‘फ्यूचर प्लॅन,’ म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळे (संग्रहित फोटो)

एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. शिंदे यांच्या मंत्रीमंडळात भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांना स्थान मिळाले आहे. याच कारणामुळे महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूक तसेच पालिका निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र भाजपाने आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये चंद्रशेखर बावनुकळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनुकळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पक्षाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले जाईल. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गट यांचे मिळून २०० उमेदवार निवडून येतील. तसेच लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू, असे म्हणत त्यांनी भाजपाच्या भविष्यकालीन योजनेबद्दल माहिती दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >>> दीपक केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

“माझ्यावर ठेवण्यात आलेल्या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) लोकसभा निवडणुकीत ४५ जागा जिंकणार तर विधानसभा निवडणुकीत आमचे २०० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास चंद्रशेखर बावनुकळे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> “…मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?”, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बावनकुळे यांनी भाजपाच्या केंद्रीय तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. तसेच भाजपाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे ग्वाहीदेखील त्यांनी दिली. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मला पुढच्या काळात सर्वांना सोबत घेऊन भाजपाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा पक्षाला उभे करण्याची माझ्यावर जबाबदारी आहे. मागील २९ वर्षात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात आली, ती मी पार पाडत आलो आहे. गावाच्या अध्यक्षापासून ते महाराष्ट्रच्या अध्यक्षपदापर्यंत माझा प्रवास राहिलेला आहे,” असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या