सोलापूर : भाजपच्या एका ३३ वर्षांच्या पदाधिकारी तरूणीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेक दिवस लैंगिक अत्याचार केले आणि नंतर धमकावल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सोलापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी २६ आॕगस्टपर्यंत देशमुख यांना अटक न करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis Live Updates : विधिमंडळ कामकाजाच्या महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर

श्रीकांत देशमुख हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांची पीडित अविवाहित तरूणीबरोबर ओळख झाली होती. पीडित तरूणीही भाजपची पदाधिकारी होती. देशमुख यांनी आपल्या पत्नीशी आपले तीव्र मतभेद असून आपण तिच्यापासून तीन वर्षांपासून अविभक्त राहतो आणि तिच्याकडून घटस्फोट घेणार आहोत, असे सांगून त्याने पीडित तरूणीशी खोट्या लग्नाचा बनाव केला. नंतर सोलापूर, मुंबई, पुणे, सांगोला आदी ठिकाणी तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. परंतु शेवटी त्याने खरे रंग दाखविल्यानंतर पीडित तरूणीला मानसिक धक्का बसला. तिने जाब विचारला असता देशमुख याने तिला धमकावले. एवढेच नव्हे तर स्वतःचे राजकीय वजन वापरून देशमुख याने शहाजोगपणाचा आव आणत, पीडित तरूणी आपणास ब्लॅक मेलिंग करून पैसे मागत असल्याची फिर्याद मुंबईत ओशिवारा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

दरम्यान, पीडित तरूणीने श्रीकांत देशमुख याच्यासोबत स्वतः एका बंद खोलीत असतानाचे उभयतांमध्ये झालेल्या संवादाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत केली. तसेच भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाचीही ध्वनिफित समाज माध्यमांवर प्रसारीत केली. यात शेवटी श्रीकांत देशमुख यांना भाजप जिल्हाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. तर दुसरीकडे पीडित तरूणीने पुण्यात डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात देशमुख यांच्या विरूध्द लैंगिक अत्याचाराची फिर्याद शून्य क्रमांकाने नोंदविली. हा गुन्हा सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग झाला असता त्यात अटक होण्याच्या भीतीने देशमुख यांनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरघाटे यांच्या समोर याप्रकरणाची सुनावणी होत असताना देशमुख यांना तात्पुरती अटक न करण्याचा आदेश देण्यात आला होता. नंतर प्रत्यक्ष सुनावणीप्रसंगी देशमुख यांना न्यायलयात हजर राहण्याचाही आदेश न्यायालयाने दिला होता.

दरम्यान, आरोपी देशमुख यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांच्याकडून पीडित महिलेसह तपास यंत्रणेवर दबाव येण्याची दाट शक्यता आहे. पीडित तरूणीनेही आरोपी देशमुख यांच्याकडून आपणांस खटला मागे घेण्यासाठी वारंवार धमक्या येत असल्याची तक्रार प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे. देशमुख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल आहे. पोलिसांकडे खोट्या व बनावट तक्रारी करून काही प्रतिष्ठित व्यक्तींची फसवणूक केल्याचीही त्याच्या विरोधात तक्रारी आहेत. ज्या राष्ट्रीय पक्षाने देशाला पंतप्रधान व राष्ट्रपती दिले, त्या भाजपची ख्याती जगभर असताना श्रीकांत देशमुख हे या पक्षाची बदनामी होईल, या दृष्टिकोनातून आपल्याच पक्षाच्या  पदाधिकारी महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले आहेत. स्वतः विवाहित असताना एका अविवाहित तरूणीवर लैंगिक अत्याचार करताना त्यांनी स्वतःच्या पत्नीचीही फसवणूक केली आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यास गुन्ह्याच्या तपासावर विपरीत परिणाम होईल, अस युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिं राजपूत यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करून देशमुख यांना अटकपूर्व जामीन नाकारला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी त्यांना दोन दिवस अटक करू नये, असे आदेशही न्यायालयाने पारित केले. आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. विनोद सूर्यवंशी तर मूळ फिर्यादीतर्फे ॲड. महेश जगताप व ॲड. विद्यावंत पांढरे यांनी काम पाहिले.