scorecardresearch

Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”

होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे; डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी

होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ही नियमावली पाठवण्यात आली असून या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. झाडे तोडणाऱ्यांवर यावेळी कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही जाती-धर्मांच्या भावना दुखावतील अशा घोषणा देण्यास व तसे फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी या निर्बंधांवरुन संताप व्यक्त केला असून महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का? अशी विचारणा केली आहे. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही यावेळी त्यांनी दिली आहे.

राम कदम ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत?

“महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असं राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

गृहखात्याने जारी केलेले नियम

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे

होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.

दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.

होळी खेळताना महिला तसेच मुलींनी खबरदारी घेण्याचे आवाहन.

कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp ram kadam on maharashtra government guidelines for holi celebration sgy

ताज्या बातम्या