“शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात,” रावसाहेब दानवेंचं धक्कादायक वक्तव्य

“हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही”

एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, “हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? अशी विचारणाही यावेली रावसाहेब दानवे यांनी केली.

आणखी वाचा- ८० वर्षाच्या शरद पवारांची सत्ताधारी पक्षाला भीती वाटते- धनंजय मुंडे

“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, “भाजपाच्या नेत्यांना किती मस्ती आणि उन्माद आहे हे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत आहे. दानवे स्वत: अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था पाहतात. त्यांनी जबाबदारीने बोलणं अपेक्षित आहे. दिल्लीत पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी येऊन आंदोलन करतायत म्हणते यावरुन भाजपाच्या शेतकऱ्यांसाठी काय भावना आहेत हे दिसून येतं. हे निषेधार्ह आहे”.

भाजपाचे नेते सोडून या देशातील सगळी जनताच पाकिस्तानी आणि चिनी आहे का असा संशय येऊ लागला आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. दानवेंच्या वक्तव्यामुळे परिस्थिती बिघडू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच पाकिस्तान आणि चीनचे शेतकरी आणि ५६ इंच छाती असणारे पंतप्रधान कुठे होते ? असा सवालही त्यांनी विचारला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp raosaheb danve allege china pakistan behind farmer protest sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या