अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील गणोजा गावात आमदार बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले होते. मात्र, तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. दरम्यान, या घटनेवरून भाजपा नेत्याने बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांना रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मंत्रीपद न मिळाल्याने त्याचा राग ते लोकांवर काढतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून अमित शाहांचं अभिनंदन; म्हणाले, “पुढे सुद्धा अशी…”

काय म्हणाले गोपाल तिरमारे?

“बच्चू कडू हे काल एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले होते. मात्र, तेथे ग्रामस्थ आणि बच्चू कडू यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी त्यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावली. स्वत:च्याच पक्षातल्या कार्यकर्त्याला असं सार्वजनिक ठिकाणी मारणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. एखादा कार्यकर्ता नेत्यासाठी काम करत असेल आणि तोच नेता जर कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावत असेल तर गंभीर बाब आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया गोपाल तिरमारे यांनी दिली आहे.

“…म्हणून ते लोकांवर राग काढतात?”

“बच्चू कडू यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं, राज्याच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान न मिळाल्यामुळे त्याचं मन विचलित झालं आहे. त्याचा राग ते लोकांवर काढत आहेत. काही दिवस आधीच करजगांव येथे कामाच्या दर्जावरून लोकांनी जाब विचारला असता, त्यांनी तेथील एका नागरिकाला नालायक म्हणून संबोधतले होते. त्यामुळे त्यांनी आपला राग अनावर न होऊ देता संयमाने काम घ्यावे. त्यांची मगरूरी अशीच सुरू राहत असेल, तर भाजपा हे मुळीच खपवून घेणार नाही. त्यांनी लोकांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा ते खपवून घेणार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी १३० वकिलांची फौज; सरन्यायाधीशांच्या मुलाचाही समावेश

नेमकं काय घडलं होतं?

गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले. त्यावेळी बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, तर कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता. रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या कार्यकर्त्याने केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं. यावर कार्यकर्त्यानेही बच्चू कडूंना प्रत्युत्तर देत मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं म्हटलं. त्यावर संतापलेल्या बच्चू कडूंनी तक्रारदार कार्यकर्त्याला तू पहिल्यांदा ऐकून घे, असा दम दिला. अशातच गावातील एका व्यक्तीने मध्ये हस्तक्षेप करत बोलण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडूंनी त्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्यालाही शांत बस असं सांगितलं.