जळगावात कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार भरती करण्यात येणार असल्याची जाहीरात समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर टीका केली. “भाजपाला महाराष्ट्राचं नेमकं काय करायचं आहे?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तर, भाजपानेही सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळे ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हणाल्या, “भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचं आहे? आता तहसीलदार देखील कंत्राटी पद्धतीनं नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे. खरंतर या सरकारने मुख्यमंत्री, हवे तेवढे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अख्ख मंत्रीमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला द्यावं. उपहासाचा भाग सोडला, तर हे सरकार असे असंवेदनशील निर्णय का घेत आहे, याचे आश्चर्य वाटते.”
हेही वाचा : ओबीसी बैठकीत अजित पवारांबरोबर वाद झाला? छगन भुजबळ म्हणाले, “एका घरात…”
“…तर किमान कुणाचं वाईट तरी करु नये”
“या राज्यात लाखो मुलं दरवर्षी तहसीलदार आणि तत्सम पदांवर निवड होण्यासाठी एमपीएससीची परीक्षा देतात. यासाठी वर्षोनुवर्षे झिजून अभ्यास आणि मेहनत करतात. त्यांची अर्धी संधी अगोदर लॅटरल एन्ट्रीच्या नावाखाली आणि उरलेली अर्धी कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली गिळंकृत केली. संपूर्ण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणारे हे असले आदेश काढण्याआधी किमान या मुलांचा तरी विचार सरकारनं करायला हवा होता. काही चांगलं करता येत नसेल तर किमान कुणाचं वाईट तरी करु नये, हे तत्त्व या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही,” असं टीकास्र सुप्रिया सुळे यांनी सोडलं होतं.
“…परत राजकीय द्वेष म्हणून रडू नका”
याला भाजपानेही ‘एक्स’ अकाउंटवरून सुप्रिया सुळेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. “ताई, विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण करू नका.. आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल.. परत राजकीय द्वेष म्हणून रडू नका.. कंत्राटी भरतीची संबंधित जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तुमच्यासारख्या राजकीय लोकप्रतिनिधिंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणे चालू केलं आहे,” भाजपानं म्हटलं आहे.
“आम्ही तोंड उघडले तर…”
“जेव्हा तुम्ही सत्तेत होते, तेव्हा काळ्या यादीत असणाऱ्या कंपन्यांना नोकरभरतीचे कंत्राट देऊन परीक्षा घेतलेल्या. सुप्रियाताई याबद्दल तुम्हाला चांगलीच माहिती आहे. प्रितेश देशमुख, न्यासा कम्युनिकेशनबद्दल आम्ही तोंड उघडले तर ताई, तुम्हाला ( पक्षाला ) अवघड होईल. कारण, तुमच्या काळात प्रितेश देशमुख जामिनावर बाहेर आहे. न्यासाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत भ्रष्टाचार तर झाला होता म्हणून, तुमच्या तत्कालीन सरकारला भरतीही रद्द करावी लागलेली होती,” असं भाजपाने सांगितलं.
“आपल्यासारख्या अभ्यासू संसदरत्न लोकप्रतिनिधी जर…”
“त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा फॅक्ट समजावून घेऊन ट्विट करायला पाहिजे होतं. तुम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहात. आपल्यासारख्या अभ्यासू संसदरत्न लोकप्रतिनिधी जर असं विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत राजकारण करत असतील तर त्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणतीही नाही,” अशा शब्दांत भाजपानं खडसावलं आहे.
“आमचं सरकार विकासाची काम करत आहे, त्यामुळे…”
“ही भरती परमनंट नाहीच. शिवाय एमपीएससीच्या कोणत्याही जागा कमी किंवा रद्दकरून ही भरती करण्यात येत नाही, ही बाब सुप्रिया सुळे यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. काही तत्काळ कामासाठी तातडीने अधिकाऱ्यांची गरज आहे. एवढ्या कमी वेळेत आवश्यक ते अधिकारी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे कामे लवकर होण्यासाठी ही तत्काळ भरती होत आहे. आमचं सरकार विकासाची काम करत आहे. त्यामुळे काम लवकरात लवकर होण्यासाठी तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. नाहीतर नंतर तुम्ही राजकारण करून म्हणाल की अडीच वर्षे सत्ते असून काय काम केली?” असा टोलाही भाजपानं सुप्रिया सुळेंना लगावला आहे.