नगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ, तसेच भाजप, रा. स्व. संघ हटाव-लोकशाही बचावह्णची मागणी करत विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी नगरमध्ये सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी दंडाला काळय़ा फिती बांधून मोदी सरकारचा निषेध केला. जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाजवळ हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, सैनिक समाज पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, तसेच नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी बोलताना प्रमुख वक्त्यांनी राहुल गांधींचा संसदेतील आवाज दाबण्यासाठी भाजपने कारवाई केली, असा आरोप करण्यात आला. विविध पक्षांचे पदाधिकारी किरण काळे, शशिकांत गाडे, संजय झिंजे, संभाजी कदम, प्रताप शेळके, रोहिदास कर्डिले, संपत म्हस्के, अरुण म्हस्के, रोहिदास कर्डिले, बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, उद्धव दुसुंगे, शरद झोडगे, प्रकाश पोटे, केशव बेरड, सुभाष लांडे, बन्सी सातपुते, भैरवनाथ वाकळे, अर्षद शेख, शाकीर शेख, रवी सातपुते, शिवाजी साळवे, अॅड. शिवाजी डमाळे, डॉ. श्रीधर दरेकर, सुजित क्षेत्रे, अॅड. मंगेश काळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन अन्वर सय्यद यांनी केले. शहर राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीची चर्चा राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी असली तरी नगर शहरात आज झालेल्या भाजपविरोधातील विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनात नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणी सहभागी झाले नव्हते. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला आंदोलनाच्या पूर्वनियोजन बैठकीचा निरोपही दिला गेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुक्यातील पदाधिकारी सहभागी होते. मात्र नगर शहरातील राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीची चर्चा होत होती.