देशात सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं असून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपाने राज्यभरात संवाद यात्रेचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यादरम्यान कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता किसान मोर्चा तर्फे आयोजित “किसान आत्मनिर्भर यात्रा” काढण्यात आली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र मधून या यात्रेला सुरुवात झाली आहे.

यानिमित्ताने रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. “मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात विरोध करतात, मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात,” अशी टीका त्यांनी केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

आणखी वाचा- ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचे काम – देवेंद्र फडणवीस

“शरद पवारांचं मनावर घेऊ नका. ते नेहमी उलट बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसं लिहून ठेवलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.

”शरद पवार तुम्ही जास्त खोटं बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. २७ डिसेंबरपर्यंत ही यात्रा चालणार असून इस्लामपूर येथे जाहीर सभेने सांगता होणार आहे. या सभेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित असतील.