सांगली : राजकीय द्वेषातून विरोधक आणि त्यांच्या संस्था संपवू पाहणारे आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याने त्यांचे सूडाचे राजकारण क्रांतिकारी मातीतील मतदारच आता संपवतील, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केली. भोसले-पाटील म्हणाले, जिल्ह्यात राजकीय मतभेद यापूर्वीही होते, मात्र हे मतभेद विकासाच्या मुद्द्यावर आहेत. निवडणूक संपली की मतभेद संपले पाहिजेत, अशीच जुन्या नेत्यांची धारणा होती. विरोधकांच्या चांगल्या धोरणांना पाठिंबा देण्याची मानसिकताही या नेत्यांनी बाळगली. अशा सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यात आ. पाटील यांच्यासारखा चेहरा विरोधकांना देशोधडीला लावण्याबरोबरच कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे कुटिल राजकीय डावपेच आखतो आणि अमलात आणतो हे दुर्दैव. मात्र, आता हे सामान्य लोकांच्या लक्षात आले असल्याने जनता अशा नेत्याच्या कृष्णकृत्यांना यापुढे पाठबळ देणार नाही. हेही वाचा.Uddhav Thackeray : “अरे सुपारी तोंडातून थुंक मग ‘आणि म्हणून’ असं सरळ..”, उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली ते म्हणाले, की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने पुढे येऊन शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात संस्था उभी केली, मात्र केवळ राजकीय सूडातून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता यापुढे जशास तसे उत्तर देणार असून यासाठी वाळवा मतदारसंघातील जनताही साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुरेखा जगताप आदी उपस्थित होते.