scorecardresearch

Video: “बाळासाहेब ठाकरे कोण आहेत?” इम्तियाज जलील यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपाचं ठाकरे गटावर टीकास्र!

“काल परवाचंच इम्तियाज जलील (झलील) यांचं हे वक्तव्य. यावर आत्तापर्यंत ना उद्धव ठाकरे बोलले, ना आदित्य ठाकरे बोलले. फक्त…!”

imtiyaz jaleel on balasaheb thackeray bjp video
इम्तियाज जलील यांचा 'तो' व्हिडीओ भाजपानं केला शेअर! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्रात आज एकीकडे धुलिवंदनाच्या निमित्ताने जनसामान्यांपासून राजकीय मंडळींपर्यंत सगळेच वेगवेगळ्या रंगांत न्हाऊन निघाले असताना दुसरीकडे नेतेमंडळी राजकीय आरोप-प्रत्यारोपांचीही उधळण करताना दिसत आहेत. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी साखळी उपोषण सुरू केलं आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून जलील यांना लक्ष्य केलं जात असताना आता भाजपाकडून जलील यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवरून त्यांनी थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

“फक्त माझे वडील, माझे आजोबा म्हणून…”

भाजपा महाराष्ट्रचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ‘मुंबई तक’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया आहे. या व्हिडीओसह केशव उपाध्येंनी केलेल्या ट्वीटमध्ये ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. “बालासाहेब ठाकरे हौ कौन? काल परवाचंच इम्तियाज जलील (झलील) यांचं हे वक्तव्य. यावर आत्तापर्यंत ना उद्धव ठाकरे बोलले, ना आदित्य ठाकरे बोलले ना ठाकरे गटाचा कुठला नेता बोलला. नुसतं माझे वडील, माझे आजोबा असं म्हणून वारसा सिद्ध होत नसतो”, अशा शब्दांत केशव उपाध्येंनी ठाकरेंवर टीका केली आहे.

“काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात, मला त्यांना सांगायचंय की..”, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!

काय आहे व्हिडीओमध्ये?

केशव उपाध्येंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये इम्तियाज जलील औरंगाबादच्या नामांतरावरून सरकारवर टीका करताना दिसत आहेत. यावेळी जलील यांनी बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. “बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? ते असे कोण होते ज्यांचं स्वप्नं पूर्ण झालं आहे? भारतात काही मोजके लोक असे आहेत ज्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. हे महोदय त्यांच्यातले एक होते. निवडणूक आयोगाने असे आदेश दिले होते की सहा वर्षं तुम्ही मत देऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे काही फार मोठे वगैरे नव्हते की त्यांचं स्वप्नं पूर्ण झालं असं म्हणाल. पण यांच्या खालच्या दर्जाच्या राजकारणामुळे तुम्हाला माझ्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कुणी दिला?” असा सवाल इम्तियाज जलील विचारताना या व्हिडीओत दिसत आहेत.

“अमेरिकेनं लादेनला मारलं, त्याची कबर…”, इम्तियाज जलील यांना संजय शिरसाट यांचा टोला; म्हणाले, “बिर्याणी खाऊन..”

दरम्यान, व्हिडीओमध्ये नवी मुंबई असं ठिकाणाचं नाव दिसत असलं, तरी हा व्हिडिओ नेमका कुठल्या कार्यक्रमातला आणि कधीचा आहे, याविषयी स्पष्टता येऊ शकलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 15:00 IST