scorecardresearch

भाजप, शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे मारेकरी – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले असा खोटा प्रचार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे.

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले असा खोटा प्रचार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. हे चार पक्षच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या निमित्ताने तसेच ओबीसी आरक्षणाबाबतची सत्यस्थिती मांडण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीत या चारही पक्षांना ओबीसी बांधवांनी मतदान करू नये. आम्ही भाजपसोबत कदापीही आघाडी करणार नाही. काँग्रेससोबत आघाडी करायची तयारी आहे, त्यांनी चर्चेसाठी समोर यावे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

मागासवर्गीय आयेागाचा अहवाल कोणतेही संशोधन न करता सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने हा अहवाल फेटाळला. यासाठी सर्वस्वी भाजपच दोषी आहे. आरक्षणाबाबत कायदा करून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याची चांगली संधी राज्य शासनाला होती, परंतु सरकारने अद्याप काहीही केले नाही. राज्यातील तीन पायाचे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. अनेक मंत्री कारागृहात असून हे लुटारूंचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेस वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, फारूक अहमद, गोविंद दळवी, शिवा नरंगले, प्रा. नागोराव पांचाळ  आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp shiv sena both congress obc reservation killers ysh

ताज्या बातम्या