Sanjay Shirsat on BJP Shiv Sena 2029 Election: भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचा उल्लेख सामना वृत्तपत्रातील संपादकीयमध्ये करण्यात आला होता. या लेखाची चर्चा होत असताना आता शिवसेनेचे (शिंदे) मंत्री संजय शिरसाट यांनीही २०२९ च्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना (शिंदे) स्वबळावर निवडणूक लढवू शकतो. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी करत असतो, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.

सामना संपादकीयमध्ये काय लिहिले होते?

“भाजपा भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपाची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे आणि उद्या शिंदे यांचे आमदारही भाजपामध्ये जातील”, असा उल्लेख सामनाच्या संपादकीय लेखात आहे.

या उल्लेखाबाबत संजय शिरसाट यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले, “प्रत्येक राजकीय पक्ष आपली संघटना मजबूत करण्याच्या आणि निवडणुकांची तयारी करण्याचा प्रयत्न करत असतो. तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. मित्रपक्ष जर स्वतंत्रपणे निवडणूक लढवू इच्छित असतील तर त्यांना रोखणारी कोणतीही राजकीय व्यवस्था नाही.”

भाजपा २०२९ ला स्वबळावर निवडणूक लढवू शकतो का? तर लढवू शकतो. हीच गोष्ट शिवसेना (शिंदे) पक्षालाही लागू होते. मित्रपक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवू नये, यासाठी राजकारणात कोणताही करार किंवा बाँड नसतो. भाजपा आणि शिवसेना (शिंदे) वेगळे होऊन अगदी एका जागेसाठीसुद्धा स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतील, असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

२०१४ साली स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयोग

भाजपा आणि शिवसेना (संयुक्त) यांनी यापूर्वी एकत्र आणि एकमेकांच्या विरोधात (स्वबळावर) निवडणूक लढविल्या आहेत. २०१४ साली विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले असताना दोन्ही पक्षांनी युती तुटल्याची घोषणा करत वेगवेगळी निवडणूक लढवली होती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी तोडली होती. निकालानंतर भाजपा १२२, शिवेसना (संयुक्त) ६३, काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४१ जागा निवडून आल्या होत्या.