संगमनेर : संगमनेर नगरपालिकेच्या कारभारात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या पतीचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. महायुतीच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची व नगराध्यक्ष पद रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, अजित जाधव, विशाल एनगंदुल, शशांक नामन, अक्षय वर्पे, सिद्धार्थ तुरकने, अनिकेत चांगले आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

महिलांना राजकारणात सक्रिय सहभाग मिळावा, यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण राज्य सरकारने दिले आहे. तसेच महिला पदाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता यावे, यासाठी देखील स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यानुसार महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीला संबंधित संस्थेच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास मनाई असल्याचे महायुतीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीपासून नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजात नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे पती आमदार सत्यजित तांबे सातत्याने हस्तक्षेप करत असल्याचे दिसून येत आहे. ते नगरपालिकेत प्रत्यक्ष उपस्थित राहत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत बैठकाही घेत असल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कारभारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायत अधिनियम, १९६५ च्या कलम ४४ नुसार मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांची कोणतीही कृती कायद्याविरुद्ध आढळल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा अधिकार असल्याचा दावाही तक्रारदारांचा आहे. याशिवाय या प्रकरणात राजकीय दबावामुळे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.