महापालिका निवडणुकीसाठी युतीतील जागांचा तिढा गुरुवारीही कायम राहिला. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकीत लढविलेल्या जागांपेक्षा ९ जागा वाढवून दिल्या. ४८ जागांवर भाजपला त्यांचे उमेदवार देता येतील, असे सांगण्यात आले. मात्र, किमान ५३ जागा मिळाव्यात, या साठी भाजप आग्रही आहे. गुरुवारी रात्री पुन्हा एकदा जागांच्या तिढय़ाबाबत चर्चा होईल. मात्र, राजाबाजारच्या वॉर्डावरून युतीचे घोडे अडले आहे. या वॉर्डातून किशनचंद तनवाणी यांचे समर्थक जगदीश सिद्ध शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश घेतला.
समांतर जलवाहिनीच्या कामात सत्तेतील शिवसेनाच जबाबदार असल्याचा संदेश भाजपच्या नगरसेवकांनी पद्धतशीर पोहोचविला आहे. सर्वसाधारण सभेत जगदीश सिद्ध यांनी शिवसेना अडचणीत येईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तनवाणी यांचे समर्थक असणारे सिद्ध यांच्या वॉर्डावरून युतीत मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. युतीमधील जागावाटपाच्या अनुषंगाने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे म्हणाले की, त्यांनी ४५ व ५५ टक्के असे सूत्र आता स्वीकारले आहे. आम्ही आणखी तीन-चार जागा मिळाव्यात, अशी विनंती करीत आहोत. ५२-५३ जागा आम्ही लढवाव्यात, असे वाटते. तसा प्रस्तावही दिला. मात्र, सूत्र ठरल्यानंतर वॉर्ड आणि जागांची अदलाबदल याविषयी निर्णय घेतला जाईल. ‘एमआयएमचे भूत’ शहरावर बसण्यापेक्षा युती केलेली चांगली, असा आमचा प्रयत्न आहे.
शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनीही, चर्चा सकारात्मक सुरू आहे. मात्र, काही जागांमुळे घोडे अडले आहे. गुरुवारी रात्री होणाऱ्या बैठकीत हा प्रश्न सुटेल. राजाबाजार आणि सुरेवाडी या दोन वॉर्डावरून मतभेद आहेत. भाजपमध्ये नव्याने आलेल्या काही जणांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे. त्यामुळे त्यांना योग्य न्याय देण्यासाठी बोलणी सुरू आहेत. युती व्हावी अशी प्रामाणिक इच्छा आहे, हे वाक्य मात्र शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या तोंडी आहे.