सांगलीतील पूरग्रस्त भागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान सांगलीतील हरभट रोडवर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आमनेसामने आले. निवेदन देण्यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही कार्यकर्त्यांना दूर करत शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा ताफा या भागात आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. भाजपा पदाधिकारी स्टंटबाजी करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. भाजपाच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी हरभट रोडवर ठिय्या मांडला होता. “दोन तासांपासून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही वाट बघत होतो. पण आमचं निवेदन न स्वीकारताच मुख्यमंत्री निघून गेले.”, असा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांच ऐकणारे मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांच्याकडे निवेदन मागितलं. त्याचबरोबर गर्दी कमी करण्यास सांगितलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन हातात दिलं नाही. मुख्यमंत्री पाच मिनिटं थांबले आणि निघून गेले. त्यानंतर जाणीवपूर्वक निवेदन फाडून त्यांनी शो बाजी केली.”, असा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.

संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ; निलेश राणेंचा इशारा

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर टीका केली, “ते म्हणाले आतापर्यंतची आपली प्रथा आहे. संकट आल्याबरोबर हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करतात. मात्र, ते पॅकेज कुठं जातं कुणालाचं माहीत नाही. मला असे थोतांड येत नाहीत. मी प्रमाणिकपणे मदत करणार आणि ती केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. “सांगलीतील पुरपरिस्थिती मला माहिती आहे. डोक्यावरुन पाणी जात होतं, अनेकांच्या घरात पाणी गेलं तसेच संसार उघड्यावर आले. आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शेतीचं देखील नुकसान झालं आहे. या संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे. मात्र मला आत्मविश्वास आहे की मी मार्ग काढणारचं. तात्काळ मदतीबाबत मी अंदाज घेत आहे. किती घरे उध्वस्त झाले, किती मदत करावी लागेल. तसेच काही ठीकाणी कायमस्वरुपी मदत करावी लागेल. त्यासाठी तुमची तयारी हवी,” असे मुख्यमंत्री म्हणाले.