सोलापूर: पहलगाममधील पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र लष्कराने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर जोरदार हल्ले करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्याबद्दल भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ भाजपने सोलापुरात तिरंगा यात्रा काढली. यातून मोठे शक्तिप्रदर्शन घडले.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अशोक चौकाजवळील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहिल्यानंतर तिरंगा यात्रेला प्रारंभ झाला. देशभक्तीचे नारे देत आणि तिरंगा ध्वज उंच फडकावत निघालेल्या या तिरंगा यात्रेत हजारोंचा जनसमुदाय सहभागी झाला होता. भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी आदींचा यात्रेत प्रामुख्याने सहभाग होता.
विविध मार्गांवरून फिरून ही तिरंगा यात्रा अशोक चौक, भावनाऋषी पेठ, सत्तर फूट रोड, माधवनगरमार्गे पद्म मारुती देवस्थानासमोर येऊन विसर्जित झाली. या तिरंगा यात्रेत अग्रभागी भारतमातेची प्रतीकात्मक मूर्ती ठेवण्यात आली होती. त्या जोडीला पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने शौर्य दाखवत केलेल्या कारवाईत प्रकाशझोतात आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याही प्रतिमा दिमाखात विराजमान झाल्या होत्या.
सोबत ‘ऑपरेशन सिंदूर’चा यशस्वी संदेश देणारी प्रतिमाही ठेवण्यात आली होती. यात्रेत पक्षाचे आमदार विजयराज देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या इतर आजी-माजी आमदारांचा सहभाग दिसून आला नाही.