“संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे,” अशा कठोर शब्दांमध्ये नवनीत राणा प्रकरणावरुन भाजपावर शिवसेनेनं निशाणा साधल्यानंतर आता भाजपाने या टीकेला तितक्याच कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलंय. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवरुन शिवसेनेच्या टीकेवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांचाही प्रत्यक्ष उल्लेख टाळत संदर्भ दिलाय.

शिवसेनेनं नेमकं काय म्हटलंय?
“भारतीय जनता पक्षाने सध्या हिंदुत्वाच्या नावाने जो धांगडधिंगा सुरू केला आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. हिंदुत्व हा एक संस्कार आणि संस्कृती आहे, धिंगाणा नाही. अमरावतीचे राणा दाम्पत्य हे अनुक्रमे खासदार व आमदार आहेत. ते कधी कोणत्या पक्षात असतील व कोणता झेंडा खांद्यावर घेतील त्याचा भरवसा नाही. श्रीरामाचे नाव घेण्यास राणाबाईंचा विरोध होता. संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे,” अशी टीका शिवसेनेनं आजच्या ‘सामना’च्या ‘घोटाळेबाजांचे हिंदुत्व! नुसताच थयथयाट’ या मथळ्याखालील अग्रलेखातून केलीय.

भाजपाचे उत्तर
या टीकेला उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. “रोज सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपाच्या नावानं शिमगा करायचा हा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील दगडफेकीचं समर्थन करताना जर भविष्यात खरोखरच भ्रष्टाचारी नेत्यांवर कुणी दगडफेक, चप्पला फेकल्या तरी निषेध करू नये म्हणजे झाले,” असं उपाध्ये यांनी म्हटलंय.

किती काळ हा सत्तेचा माज राहील सांगता येत नाही
“ठाकरे सरकारविरुद्ध बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा ही ऑफर नाही तर तुमच्या दहशतीला चाप बसवण्याचा लगाम आहे. सरकारविरोधात कुणी बोललं, मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले म्हणून राजद्रोहाचा खटला दाखल करणाऱ्यांचा आणखी किती काळ हा सत्तेचा माज राहील सांगता येत नाही,” असंही उपाध्ये यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आव्हाडांना टोला…
“सत्तेसाठी आंधळे झालेले काही महाभाग नेते आता स्वत:च्या स्वार्थासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांवरही आरोप करत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी १२ कोटी जनतेचा अपमान केला म्हणे, अहो, मग नवाब मलिक, अनिल देशमुख, सचिन वाझे या तुमच्या म्होरक्यांनी अभिमानास्पद कामगिरी केलीय का? माध्यमांत चर्चेत राहण्यासाठी भाजपाविरोधात वाटेल ते बोलत राहणं ही सवय मुलुंडपासून मुंब्रापर्यंत नेत्यांना जडलीय,” असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.