भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. संबंधित व्हिडीओत एका महिला श्रीकांत देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. देशमुख यांना बायको असताना देखील त्यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, असा दावा महिलेनं केला आहे. हा व्हिडीओ एका हॉटेल सदृश्य खोलीतील असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख देखील आहेत. महिला व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचं पाहून देशमुख यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा व्हिडीओ बंद झाला आहे. संबंधित व्हिडीओत महिलेनं "हा श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलंय. बायकोशी संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय, लग्न करतोय हा" असं म्हटलं आहे. यानंतर संबंधित खोलीत उपस्थित असणाऱ्या श्रीकांत देशमुख यांनी महिलेच्या हातातून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांत झटापट झाल्याचं देखील व्हिडीओच्या शेवटी दिसत आहे. हेही वाचा- “…म्हणून गद्दारी झाली”; आदित्य ठाकरे यांचं मोठं विधान, म्हणाले… हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला असून सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता पदभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली होती. पण हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.