मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज(शनिवार) सायंकाळी एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसेनेकडून हुंकार सभा असं संबोधण्यात आलं आहे, आजच्या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“विरोधकांवर ‘टोमणे बॉम्ब’ मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल.” असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रात येऊन औरंग्याच्या कबरीवर माथा टेकवून त्यांनी त्यांची विचारधारा स्पष्ट केलीय. ज्या छत्रपती संभाजी राजांना हाल हाल करून मारण्यात आलं. आज १४ मे सिंहाचा छावाच असलेल्या शंभू राजांची जयंती. गेल्या अनेक वर्षापासून हिंदूंच्या मनात जी भावना होती औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण व्हावं. बाळासाहेबांची देखील तिच इच्छा होती. आज त्यांचे चिरंजीव राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसले आहेत. हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे असं म्हणत त्यांनी मुंबईतील सभेची जाहिरातबाजी केली आहे. या सभेत मर्द, वज्रमूठ, गदाधारी, खंजीर असे शब्द वापरून विरोधकांवर ‘टोमणे बॉम्ब’ मारण्यापेक्षा संभाजी राजे जयंतीचं औचित्य साधत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करत असल्याची घोषणा भर व्यासपीठावर करावी हीच भाजपाची मागणी असेल. अन्यथा हिंदुत्वावरील आपले पुरोगामी विचार ऐकण्यासाठी कुठल्याही हिंदु बांधवांना येण्याची गरज नाही.”

“आजची सभा आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे” ; उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं विधान!

तर उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. “आजची सभा ही क्रांतिकारी सभा असेल, आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप अशी ही आजची सभा असणार आहे. या सभेतून सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील.” असं त्यांनी सांगितलेलं आहे.