Chandrashekhar Bawankule : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपासून राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा आणि उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. यातच जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळवता आलं नव्हतं, दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीला आपण कशा प्रकारे सामोरे जाणार आहोत? याबाबत सांगत लोकसभा निवडणुकीत नेमकी काय चुका झाल्या? यावरही त्यांनी भाष्य केलं. “विरोधकांकडून लोकल मुद्दे मांडण्यात आले, खरं तर आम्ही लोकसभा निवडणुकीत याचा अंदाजच घेतला नव्हता”, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“लोकसभा निवडणुकीत देशाचे मुद्दे बाजूला राहिले आणि निवडणूक लोकल मुद्यांवर लढली गेली. संसदेची निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसारखी झाली. ग्रामपंचायतीचे मुद्दे आणि नगरपालिकेचे मुद्दे त्या निवडणुकीत आले होते. महाविकास आघाडीने भाजपा संविधान बदलणार आहे, अशा प्रकारचा प्रचार केला. मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली. तसेच राहुल गांधींनी सांगितलं की त्यांचे खासदार निवडून आले तर खटाखट खटाखट पैसे देऊ. याचा अर्थ त्यांनी संभ्रम तयार केला. जनतेला खोटे बोलून मतदान घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला. आताही राहुल गांधी यांच्या एका विधानावरून असं दिसतं आहे की त्यांची मानसिकता आरक्षण संपवण्याची आहे”, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
हेही वाचा : संजयकाका पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला; सांगलीच्या राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क
“आम्ही जनतेची कामे करतो, तेव्हा आम्हाला अपेक्षा असते की आम्हाला मते मिळतील. मात्र, मते मिळाली नाहीत, त्यानंतर आम्हीही त्याच्या खोलात गेलो. लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो आहोत, त्यामधून काही शिकलोही आहोत. मात्र, आमची ती चूक दुरुस्त करून आता आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. देशाची निवडणूक स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसारखी होईल याचा आम्हाला अंदाज आला नाही. खरं तर आम्ही निवडणुकीचा अंदाजच घेतला नाही. निवडणूक अशाच मुद्यांवर फिरत राहिली. त्यामुळे आम्हाला आता अंदाज आला आहे की, निवडणुकीत काय झालं? हे मान्य आहे की काही गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत. विरोधकांकडून लोकल मुद्दे मांडण्यात आले. मात्र, आम्हीही याचाही अंदाज घेऊ शकलो नाही. १२ जागा आमच्या थोडक्यात गेल्या. परिस्थिती एवढी घासून होईल याचा अंदाज आला नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारने आणलेल्या योजना महत्वाच्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं तर हे सर्व योजना बंद करतील. मी द्याव्याने सांगतो. कारण कर्नाटकमध्ये त्यांनी सर्व योजना बंद केल्या आहेत”, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केला.
महायुतीमधील तिन्हीही पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या
“महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. आम्ही ज्या विचारांवर पक्ष चालवतो त्या पक्षाचे वेगळे विचार आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशासाठी आहोत? देशातील आणि महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष जर महायुतीच राहिलं तर महाराष्ट्राला विकासाठी फायदा होईल”, असंही बावनुळे यांनी म्हटलं आहे.