Chandrashekhar Bawankule : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध मतदारसंघाचा दौरा करत कामाचा आढावा राजकीय नेते मंडळी घेत आहेत. तसेच कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची? याबाबतही खलबतं सुरु आहेत. याबरोबरच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु आहेत. मात्र, कोणता पक्ष किती जागा लढवणार? याचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.
यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपण ८० ते ९० जागा लढवणार असल्याचं याआधी अनेकदा स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला नेमकी कसा असणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता यासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबत मोठं भाष्य केलं आहे. “जिंकण्यासाठी लढायचं हा एकच फॉर्म्युला ठरला आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “आजच तुम्हाला स्पष्ट सांगतोय, नंतर…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषण!
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“मला महायुतीमधील तिन्ही नेत्यांचं कौतुक करायचं आहे. काही दिवसांपासून चर्चा आहेत की हा पक्ष १८० जागा लढवणार, तो पक्ष ८० जागा लढवणार, पण आता असं ठरलं आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याही आकड्यावर जायचं नाही. आता असं ठरलं आहे की, फक्त जिंकण्यासाठी लढायचं आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जिंकेल, त्या ठिकाणी त्यांचा आग्रह आम्ही मान्य करणार, तसेच ज्या जागांवर शिवसेना शिंदे गट जिंकेल त्या जागांवर आम्ही त्यांचा आग्रह मान्य करणार, तसेच ज्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी जिंकेल, त्या ठिकाणी आमचा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मान्य करतील. हाच महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे धुळे दौऱ्यावर असताना भाजपाचे आमदार अमरिश पटेल यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं होतं. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावेळी अमरिश पटेल यांना पाहून तुम्ही दुसऱ्या पक्षाचे आहात, असा सवालही शरद पवार यांनी केला. या भेटीमुळे अमरिश पटेल हे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “अमरिश पटेल हे तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या चर्चा चुकीच्या आहेत”, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.