वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर हे उद्धव ठाकरे गटासोबत एकत्र येणार अशा चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम ज्यूस पिऊन मोठे झालेले नेते आहेत. त्यांना युती टिकवण्यासाठी वेळच नाही.", अशा शेलक्या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धवजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधत असताना ते म्हणाले, "उद्धवजी सोबत कुणीही राहू शकत नाही, त्यांच्या पक्षाचे आमदार त्यांच्या सोबत राहिले नाहीत. जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते काय प्रकाश आंबेडकर यांना सांभाळणार? युती चालविण्याकरिता जो दम लागतो, जी ताकद लागतं. ते कौशल्य उद्धवजींमध्ये नाही. म्हणूनच त्यांचे ५० आमदार आणि १२ खासदार त्यांना सोडून गेले. प्रकाश आंबेडकर विद्वान आहेत. त्यांना सगळं कळतं. उद्धवजी सोन्याच्या चमच्याने बदाम पिऊन मोठे झालेले नेते आहेत. त्यांना युती टिकवण्यासाठी वेळच नाही. मुळात महाविकास आघाडीमधील तीन पक्ष हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले होते. आमच्यासोबत जे पक्ष युतीमध्ये येत आहेत. त्यांचा सन्मान राखणे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगले जमते. उद्धवजींच्या रक्तातच युती टिकवणे नाही. ते कुणाचाच सन्मान ठेऊ शकत नाही, प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत." हे वाचा >> ठाकरे गट-वंचितच्या हातमिळवणीवर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले “मी अजूनही सांगतो युती झाली, पण…” शिवसेना संपविण्यासाठी संजय राऊतच पुरेसे दुसरीकडे आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरुन भाजपावर निशाणा साधला होता. मुंबईतील विकासकामांचे उद्घाटन हे शिवसेनेला संपविण्यासाठी केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. या आरोपवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, शिवसेना संपविण्याकरिता मोदीजी यांना यायची गरज नाही. त्याला संजय राऊत पुरेसा आहे. उद्धवजी यांनी मुंबई पुरात बुडवली त्याला भाजप बाहेर काढत आहे, आम्ही विकासात्मक काम करतो आहोत. मोदीजी विकासाकरीता येणार आहेत. शिवसेनेसाठी आम्ही छोटे कार्यकर्ते पुरेसे आहोत. त्यांच्याकडचे सगळे लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहे. तेव्हा अजित पवारांनी बाप का काढला? अजित पवार हे बावनकुळेंना वाचाळवीर म्हणाले होते. त्यावर उत्तर देत असताना बावनकुळे म्हणाले, "वाचाळवीर कोण हे राज्याला माहीत आहे. अजित पवार यांनी भर सभागृहात मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणाले. हे त्यांना शोभतं का? राज्यातील जनतेला खरे वाचाळ वीर कोण? माहीत आहेच. तुम्ही स्वराज्यरक्षक म्हणा आमची काहीच हरकत नाही. पण ते धर्मवीर नव्हते, हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला."