scorecardresearch

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…

आदित्य ठाकरेंच्या सभेवर झालेल्या दगडफेकीवरही दिली आहे प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Chandrashekhar Bawankule on mahavikas aghadi
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (संग्रहीत छायाचित्र)

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय काल औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील आदित्य ठाकरेंच्या सभेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरही बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांच्यावर किंवा त्यांनी जे काही सांगितलं की दगडफेक झाली आणि शिंदे गटाच्या आमदाराच्या समर्थकांनी दगडफेक केली. मला वाटतं की महाराष्ट्र पोलीस याचा तपास करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं कधी समर्थन करत नाहीत. आदित्य ठाकरे असो किंवा आणखी कुणीही असो, या राज्यात कुणाच्याही वाहन ताफ्यावर दगडफेक करणे, विरोधी पक्षाचा जरी नेता असेल तर त्यांच्याबद्दल वाईट वागणे किंवा त्यांच्याविरोधात गुंडा गर्दी करणे, रस्त्यावर या पद्धतीने प्रदर्शन करणे हे कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खपवून घेत नाहीत. मला वाटतं याची चौकशी केली जाईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

हेही वाचा – “…त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत, नाहीतर…” मनसे आमदार प्रमोद पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा!

याशिवाय, “आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला उद्देशून येत्या अधिवेशनात राज्यपालांचं अभिभाषण होण्याआधी या महाराष्ट्रद्वेष्ट्या राज्यपालांना त्यांनी बदलून दाखवावं, असं आव्हान दिलं आहे. यावर बोलताना बावनकुळेंनी म्हटले की, राज्यपाल बदलाचे अधिकार ना आदित्य ठाकरे यांना आहेत ना मला आहेत. तो केंद्रीय व्यवस्थेमधला विषय आहे. मला वाटतं की आदित्य ठाकरे हे आता राष्ट्रीय नेते झाल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या बोलण्यावर उत्तर देणं काही योग्य नाही.”

हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या सभेत दगडफेकीच्या घटनेवरून अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप, म्हणाले…

याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी काल वरळीमध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतील कमी गर्दीवरून केलेल्या टीकेवरही बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “खरंतर संजय राऊतांना दोन चष्मे आहेत. एका चष्म्यातून बघितलं तर त्यांना पूर्ण हिरवं रान दिसतं आणि दुसऱ्या चष्म्यातून हिरवं रान जरी असलं तरी त्यांना तिथे कोरडा दुष्काळ दिसतो. त्यामुळे संजय राऊत हे समोर महाविकास आघाडी असेल तर दुसऱ्या चष्म्यातून बघतात. नाहीतर मग त्यांना कोरडा दुष्काळ दिसतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल प्रचंड मोठी सभा घेतली. कुठल्याही खुर्च्या उचलाव्या लागल्या नाहीत, प्रचंड मोठी सभा झाली आणि त्या ठिकाणी चांगलं समर्थन एकनाथ शिंदे यांना मिळालं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 11:53 IST