BJP Ravindra Chavan Statement: “मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे”, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या विधानानंतर महायुतीमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. दोन डिसेंबरला राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. या विधानानंतर भाजपाच्या नेत्यांनी सारवासारव करत चव्हाण यांना तसे काही म्हणायचे नव्हते, असे म्हटले. त्यानंतर आता रविंद्र चव्हाण यांनी आणखी एक विधान केले असून त्याचा आणि महायुतीमधील अंतर्गत वादाचा संबंध जोडला जाण्याची शक्यता आहे.
रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
विटा नगरपरिषदेच्या प्रचार सभेत बोलत असताना रविंद्र चव्हाण यांनी सांगली जिल्ह्याचे नेते, स्व. आर. आर. पाटील यांची आठवण काढली. २०१४ साली भाजपाचे सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केलेले भाषण गाजले होते. याच भाषणाचा उल्लेख रविंद्र चव्हाण यांनी केला. त्या भाषणातील काही वाक्यांचा दाखला त्यांनी दिला. ज्यामुळे आता महायुतीत पुन्हा वाद उद्भवू शकतो.
नंबर दोनला काही किंमत नसते
रविंद्र चव्हाणांनी त्या भाषणाची आठवण सांगताना म्हटले, “आर. आर. पाटील आपल्या भाषणात म्हणाले होते की, मी काँग्रेस, राष्ट्रवादी या आघाडीत बरेच वर्ष काम केले. मोठ मोठी पदे भूषवली. मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण नंबर एक होऊ शकलो नाही, तर नंबर दोनच राहिलो. बाबांनो, नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोन याला काही किंमत नसते.”
रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, “हे माझे वाक्य नाही तर आर. आर. आबांचे वाक्य आहे. त्यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ अनेकदा व्हायरल होत असतो. सांगलीत आल्यानंतर मला बरेच लोक काय काय सांगत आहेत. सदाभाऊही बरंच काही बोलत होते. मी एवढेच सांगेन निदान आबांच्या भाषणावर तरी विश्वास ठेवा.”
जे काही आहे ते सर्व देवाभाऊच..
कार्यकर्त्यांना संबोधित करताना रविंद्र चव्हाण यांनी सबकुछ देवाभाऊ असा संदेश दिला. “जे काही आहे ते सर्व देवाभाऊच आहे. सगळ्या बहिणींचाही भाऊ आणि इतरांचाही भाऊ.
२ डिसेंबरबद्दल काय म्हणाले होते?
यापूर्वी रविंद्र चव्हाण यांनी केलेले विधानही चर्चेत होते. ते म्हणाले, “मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटे आहे.” शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैशांनी भरलेली पिशवी दाखवली होती. या प्रकारानंतर रविंद्र चव्हाण यांचे हे विधान समोर आले होते.
