शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशांनुसार उद्या अर्थात ३० जून रोजी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानभवनात हजर राहावं लागेल. दुसरीकडे बंडखोर आमदारही उद्या मतदानासाठी मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखली जात असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, अडीच वर्षांपूर्वी सत्तास्थापनेवेळी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देखील मुनगंटीवारांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“काही लोक ज्या पद्धतीच्या धमक्या देत आहेत, गुंडगिरीची भाषा करत आहेत, अशांतता निर्माण करण्याचं भाष्य करत आहेत, याकडे लक्ष देता यावं आणि प्रत्येकाला मुक्त वातावरणात लोकशाहीचा अधिकार विधिमंडळात बजावता यावा, हे आम्ही विधिमंडळ सचिव आणि उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं आहे”, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भाजपाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईत आल्यानंतर भाजपा सुरक्षा पुरवणार का? या प्रश्नावर मुनगंटीवारांनी राज्य सरकारवर टीका केली. “शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी भाजपाची नाही. ती जबाबदारी सरकारची आहे. हा माहाराष्ट्र आहे. इथे गुंडगिरी करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राची जनता आणि पोलीस विभागाचे अधिकारी सदसदविवेकबुद्धीने कृती करतील”, असं ते म्हणाले.

Maharashtra Political Crisis Live : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्या बहुमत चाचणीत…!”

“बहुमत असेल तर ५ मिनिटांत दाखवता येतं”

राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलावल्यानंतर राज्य सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यावरून मुनगंटीवारांनी खोचक टोला लगावला आहे. “तुमच्याकडे बहुमत आहे तर एका तासात तुम्ही बहुमत दाखवू शकता. तुमच्याकडे दोन हात आहेत, तर ते दाखवण्यासाठी तुम्हाला ३० दिवसांची मुदत हवीये का? हात आहेत तर ५ मिनिटांत हात दाखवू शकता. यात काय नवीन आहे. तुम्ही काय शोलेचे ठाकूर नाही ना, की तुमचे हात शालमध्ये अडकले आहेत. बहुमत दाखवायचं असेल तर दाखवा ना”, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

“अजून बरंच काही बाकी आहे”, शिवसेनेतील बंडाळीवर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!

“तेव्हा खुर्चीसाठी बेईमानी केली, आता…”

“भाजपाची भूमिका वेट अँड वॉचची आहे. जशी प्रश्नपत्रिका येईल, तशी उत्तरपत्रिका सोडवू. ही चाचणी त्यांची आहे. यात भाजपाचा विषय नाही. २४ ऑक्टोबर २०१९ला १६१ मतदारसंघात विजय मिळवून आणला. पण आमच्या मित्राच्या मनात बरोबर एक इच्छा निर्माण झाली. खुर्चीच्या पोटी गद्दारी केली. जनादेशाचा अवमान केला. आता फेडत आहेत”, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp sudhir mungantiwar mocks uddhav thackeray shivsena eknath shinde releb mla pmw
First published on: 29-06-2022 at 15:19 IST