scorecardresearch

शिवजयंतीचा वाद विधीमंडळात; मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताच अजित पवारांचं उत्तर, म्हणाले “हे सरकार…”

मुनगंटीवारांनी आक्षेप घेताच अजित पवारांनी दिलं उत्तर

मुनगंटीवारांनी आक्षेप घेताच अजित पवारांनी दिलं उत्तर

तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा वाद विधीमंडळात पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केल्याने सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. सरकारची नेमकी भूमिका काय आहे? अशी विचारणा करत त्यांनी मुख्यमंत्री साजरी करत असतील तर सरकार म्हणूनही आज शिवजयंती साजरी करण्याचा आदेश द्या अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना उत्तर दिलं.

मुनगंटीवार काय म्हणाले –

“आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती असून मुख्यमंत्री स्वत: एका कार्यक्रमाला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत. शिवसेना, भाजपाच्या काही आमदारांनीदेखील महाराजांना वंदन केलं. जयंतीच्या दिवशी जे महामानव आहेत त्यांचे फोटो लिफ्टसमोर ठेवतो आणि सदस्य पुष्प अर्पण करतात अशी प्रथा आहे. पण राज्य सरकारची नेमकी भूमिका काय?,” अशी विचारणा सुधीर मुंनगंटीवार यांनी केली.

“राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी करत असताना राज्याचे अधिकारी आम्ही १९ फेब्रुवारीला साजरी करतो म्हणतात. सरकारी अधिकाऱ्यांनी म्हणजे तिथी मान्य नाही म्हणणं म्हणजे ही द्विधा मनस्थिती आहे. ही परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या एका नेत्यानेही तिथीनुसार साजरी करा असं सांगितलं आहे. पण जर मुख्यमंत्री साजरी करत असतील तर तसे आदेश द्यावेत,” अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

अजित पवारांनी दिलं उत्तर –

“हे सरकार येण्याआधी अर्थमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी काम केलं. मीदेखील पाच वर्ष येत होतो पण तेव्हा कधीही तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली नाही. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तिथी किंवा तारखेचा वाद नको…ते आपले दैवत आहे हे त्रिवार सत्य आहे. पण मागील काळात आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा स्वर्गीय रामकृष्ण मोरे एका खात्याचे मंत्री होते. त्यांनी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला हे रेकॉर्डवर आणलं. तेव्हापासून राज्याचे मुख्यमंत्री शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरीवर जाऊन अभिवादन करुन जयंती साजरी करतात. ही परंपरा कायम असून सर्व मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

“सरकारच्या वतीने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तिथे गेले होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून शिवसेना तिथीनुसार जयंती साजरी करत आली आहे. आम्हीदेखील सरकारमध्ये असताना तारखेप्रमाणे साजरी करायचो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा, भाजपा कोणत्याही पक्षाच्या सदस्याला तिथीप्रमाणे जयंती साजरी कराची असेल तर महाराजांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन करु शकतात. कारण नसताना वेगळी चर्चा नको. सरकारी अधिकाऱ्यांना १९ फेब्रुवारीला सुट्टी देतो त्याप्रमाणे ते साजरी करतात. आज सुट्टी नसून काम सुरु आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी मागे एखादी गोष्ट केली नाही, म्हणून भविष्यात करता येत नाही का? असा सवाल विचारला. आम्ही तुम्हाला सूचना करत असताना असं उत्तर अपेक्षित नाही. जेव्हा एखादी गोष्ट लक्षात येते तेव्हा त्यात सुधारणा केली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे म्हणत असताना अडचण काय आहे? असंही त्यांनी विचारलं.

“आपल्या प्रांगणात महाराजांचा पुतळा आहे तिथे जाऊन ज्यांना करायचं आहे त्यांनी अभिवादन करा. छोट्या फोटोपेक्षा मोठ्या पुतळ्यासमोर जाऊन करा ना. उन्हात जाऊन करायला काही त्रास होतो का? सिंहासनावर बसलेले महाराज आहेत,” असं उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp sudhir mungantiwar shivjayanti ncp ajit pawar cm uddhav thackeray maharashtra assembly session sgy