Rohit Pawar on BJP and Ajit Pawar : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कालच म्हटलं आहे की त्यांना आता कुबड्यांची गरज नाही. त्यांनी आधी ठाण्याला (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला) लक्ष्य केलं, ठाण्याची ताकद कमी केली आणि आता भाजपाने बारामतीकडे मोर्चा वळवला आहे” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “भाजपा आपल्याच मित्रांना संपवते असा त्यांचा इतिहास आहे. आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे लक्ष वळवलं आहे.”
आमदार रोहित पवार म्हणाले, “सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची चौकशी लावली आहे. अजित पवार या संस्थेत कार्यरत आहेत. सरकारच्या या कृतीनंतर त्यांनी बारामतीकडे मोर्चा वळवला आहे असं दिसतंय. मुळात ही हास्यास्पद गोष्ट आहे. सरकारला चौकशीच करायची असेल तर आम्ही आतापर्यंत बाहेर काढलेल्या घोटाळ्यांची चौकशी करा. त्या विषयांत या लोकांनी तोंडावर बोट ठेवलं आहे. तिथे काही करत नाहीत आणि इतर विषयात चौकशी लावली जाते.”
भाजपा अजित पवारांना टार्गेट करतेय : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, “भाजपाकडून अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटने केलेलं काम सर्वांनी पाहिलं आहे, सर्वांनी त्या कामाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या संस्थेच्या कार्यक्रमाला आले होते. तिथे येण्यापूर्वी त्यांनी संस्थेच्या कामाची माहिती घेतली होती. तरी आता सरकारच्या पोटात काय दुखतंय ते समजलं नाही. मला असं वाटतंय की अजित पवार यांना टार्गेट केलं जात आहे.”
अमित शाह काय म्हणाले होते?
“महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून आमचा पक्ष स्वबळावर उभा आहे आणि आमचा पक्ष राज्यात ताकदीने काम करत आहे”, असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) मुंबईत व्यक्त केलं. याच वक्तव्याचा उल्लेख करत रोहित पवार म्हणाले, “भाजपाला आता कुबड्यांची गरज राहिलेली नाही. म्हणजेच त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही. वापरा आणि फेकून द्या अशी त्यांची वृत्ती आहे.”
