रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात नवनवीन समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना, खेड तालुक्यात मात्र सत्ताकारणाची गणिते उशिरा मांडली जात असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाला बाजूला सारत भाजपने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांच्याशी हातमिळवणी करत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. मात्र या महायुतीला “लेट पण थेट” अशी गोंडस उपमा दिली जात असली, तरी प्रत्यक्षात ही खेळी उशिरा सुचलेली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपचे खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय महायुतीची अधिकृत घोषणा करत मोठा राजकीय दावा केला. उशीर झाला असला तरी निर्णय स्पष्ट असल्याचे सांगत, मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मात्र, निवडणूक तोंडावर येऊनही समन्वयाचा अभाव का होता, याचे उत्तर मात्र या घोषणेतून मिळाले नाही.
आरपीआय आपली संघटनात्मक ताकद दाखवणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाला एकही जागा न देण्यात आल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोली विधानसभा संपर्कप्रमुख स. तु. कदम यांनीच दिल्याने महायुतीतील विसंगती उघड झाली आहे. उमेदवारी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे आरपीआयला जागा देता आल्या नाहीत, असे कारण देत भविष्यात मात्र आरपीआयला सोबत घेऊ, अशी ‘पुढच्या वेळी’ची ग्वाही देण्यात आली.
या वेळी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष गौतम तांबे, कोकण युवक प्रदेशाध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र उपस्थिती मोठी असली तरी निर्णय प्रक्रियेत पक्षाचा सहभाग नगण्य राहिल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
खेड तालुक्यात महायुती अधिक बळकट करण्याचे संकेत दिले जात असले, तरी “लेट पण थेट” ही घोषणा मतदारांमध्ये कितपत विश्वास निर्माण करेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. उशिरा का होईना, एकत्र येण्यामागे राजकीय मजबुरी अधिक आणि धोरणात्मक स्पष्टता कमी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
खेडच्या राजकारणात सुरू झालेली ही नवी समीकरणे आगामी निवडणुकांमध्ये किती प्रभावी ठरतात, की केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहतात, हे येणारा काळच ठरवणार आहे.

