scorecardresearch

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव ; खासदार बाळू धानोरकर यांचा आरोप

ओबीसी आरक्षण मिळत नाही, हे केंद्र सरकारचेच पाप आहे. यावर तोडगा काढायचा असेल तर केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे.

चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे देशभरातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. केंद्राने ‘इम्पेरिकल डेटा’ न दिल्यामुळे ही परिस्थिती ओढवली. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला आहे. भाजपला ओबीसींविषयी एवढे प्रेम असेल तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राने अध्यादेश काढावा, असे आवाहन त्यांनी भाजपला केले आहे.न्यायालयाच्या निकालावर बोलताना धानोरकर म्हणाले, देशात कोणत्याही राज्याने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही. त्यात भाजपची सत्ता असलेली राज्येही आहेत. फक्त महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी भाजपच्याच काही लोकांनी न्यायालयात जाऊन हा खेळ केला. भाजपचा हा खेळ देशाला महागात पडला आहे. आमच्यासाठी खोदलेल्या खड्डय़ात देशभरातील ओबीसी गेले आहेत. ओबीसी आरक्षण मिळत नाही, हे केंद्र सरकारचेच पाप आहे. यावर तोडगा काढायचा असेल तर केंद्र सरकारने अध्यादेश काढून देशातील ओबीसी आरक्षण वाचवावे. त्यासाठी भाजपने पुढाकार घ्यावा. त्याचे श्रेय त्यांनीच घ्यावे पण मार्ग काढावा, असे आवाहन खासदार धानोरकर यांनी केले. भाजपच्या खेळीमुळे ओबीसी आरक्षण अडचणीत आले आहे. आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं? मग आता मध्यप्रदेशने काय केलं, असा प्रश्न आहे. वारंवार मागणी    करूनही केंद्र सरकारने डेटा  दिला नाही त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. याला पूर्णपणे केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp trying to end obc political reservation zws

ताज्या बातम्या