प्रदेशाध्यक्ष बंद पाकिटातून नाव कळवणार;कर्डिलेंवर समन्वयाची जबाबदारी

नगर : महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमधील रस्सीखेच अद्यापी कायम आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी पुणे येथील बैठकीतही तोडगा न निघाल्याने अखेर प्रदेशाध्यक्ष बंद पाकिटाद्वारे विरोधी पक्षनेते पदाचे नाव शहराला कळवणार आहेत. दरम्यान भाजपची शहर संघटना व पक्षाचे नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याची जबाबदारी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावर सोपवण्यात आल्याचे समजले.

प्रदेशाध्यक्ष पाटील बंद पाकिटाद्वारे विरोधी पक्षनेते पदासाठीचे नाव उद्या किंवा परवा अशा दोन दिवसांतच कळवणार आहेत. या बैठकीसाठी कर्डिले यांच्यासह शहर, जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, उपाध्यक्ष संतोष गांधी यांच्यासह १५ पैकी १३ नगरसेवक उपस्थित होते.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष गंधे, माजी महापौर वाकळे, गटनेत्या मालन ढोणे, नगरसेवक मनोज कोतकर असे चौघे इच्छुक आहेत. या पदासाठी वाकळे व कोतकर यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. सत्तेसाठी शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी असली तरी आघाडीतील सेना वाकळे यांच्यासाठी अनुकूल आहे तर राष्ट्रवादीचा विरोध आहे. वाकळे महापौर होते, पदावरून  पायउतार होताच त्यांनी विरोधी पक्षनेते पदावर केलेला दावा काही नगरसेवकांना मान्य नाही, काही नगरसेवकांची शहर जिल्हाध्यक्ष गंधे यांना पसंती मिळाली नाही. मनोज कोतकर स्थायी समितीच्या सभापती पदासाठी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत गेले व आता पुन्हा पक्षात परतले आहेत. गटनेते व पक्ष संघटना यांच्यामध्ये समन्वय नाही.

त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाच्या नाव निश्चिातीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आज पुणे येथे झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. शहर संघटना व पक्षाचे नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्याची जबाबदारी माजी मंत्री कर्डिले यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कर्डिले यांच्याकडेच बंद पाकिटातील नाव पोहोच केले जाणार आहे.

याबरोबरच बैठकीत महापालिकेत सत्ता असताना गेल्या अडीच वर्षात पक्षवाढीसाठी कोणते प्रयत्न करण्यात आले याचीही माहिती प्रदेशाध्यक्षांनी घेतली. पुढील अडीच वर्षात भाजपने सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करावे अशीही सूचना देण्यात आली. शिवसेनेच्या महापौर रोहिणी शेंडगे यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी वाकळे यांना पत्र दिले होते. मात्र भाजपमधील पक्षांतर्गत विरोधामुळे ही निवड जाहीर करण्यात आली नाही. नंतर ती गेल्या महिनाभरापासून लांबणीवर पडली.