scorecardresearch

“पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले, कारवाई झाली नाही तर…” देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे.

Devendra-Fadanvis-3
"पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांवर हल्ले, कारवाई झाली नाही तर…" देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी केली. त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याच्या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याप्रकऱणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आवाहन करत भाजपावर निशाणा साधला. या टीकेला भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

“पोलिसांच्या संरक्षणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करणे, पोलीस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं, आमच्या नेत्यांवर अंडी, टॉमेटो फेकण्याचा प्रयत्न करणं, हे सर्व स्पष्टपणे लक्षात येत आहे. आपलं राज्य आहे आणि आपले गृहमंत्री आहेत, या तोऱ्यामध्ये होत आहे. आम्ही लोकशाही मानतो त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर आम्ही देखील सोडणार नाही.” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?
या मुद्द्यावरून आमदार रोहीत पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “गॅस सिलिंडर ३५० रुपयांना मिळत असताना एकेकाळी रस्त्यावर उतरून महागाई विरोधात आंदोलन करणाऱ्या स्मृती ताईंच्या स्मृती जागृत करण्यासाठी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे”, असं ट्वीट रोहीत पवारांनी केलं आहे. “भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये आणि या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी”, असं देखील रोहीत पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना टॅग करत रोहीत पवारांनी त्यांना देखील लक्ष्य केलं आहे. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे”, असं रोहीत पवार यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp vs ncp pune smriti irani program devendra fadanvis reaction rmt

ताज्या बातम्या