जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची घोषणा

कराड : सातारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्व जागा कमळाच्या चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढवल्या जातील. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, कराड नगरपालिकेत पुन्हा भाजपचाच नगराध्यक्ष असेल, या खेपेस कराडकर बहुमतही देतील, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिला.

कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

विक्रम पावसकर म्हणाले की, सातारा, कराडसह जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांची भाजपने जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक जागेवर तोडीसतोड उमेदवार देऊन कार्यकर्ते एकजुटीने निवडणूक जिंकण्यासाठी परिश्रम घेतील. कराडमध्ये गत निवडणुकीत युती केल्याचा फटका बसला. तरीही नगराध्यक्षपदाचा उमेदवार उच्चांकी मताने विजयी झाला. आता कुठेही युतीसारखा प्रयोग होणार नाही. प्रदेश समितीने सुचवल्याप्रमाणे सर्व जागी कमळाच्या चिन्हावरील उमेदवार असतील. भाजपचे करोना संकटकाळातील काम, सततचे समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रम, केंद्र शासनाच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे जनता सर्वत्र भाजपला निश्चित संधी देईल असा विश्वास विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला.

डॉ. अतुल भोसले म्हणाले की, कराड पालिकेची निवडणूक विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली तर शेखर चरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बळावर निश्चितपणे जिंकू. शेखर चरेगावकर यांनी भाजपमध्ये एकसंधपणा कायम राहील, जनता भाजपला पसंती देईल असा विश्वास दिला. एकनाथ बागडी म्हणाले की, आज मतदान केंद्रनिहाय आढावा घेताना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. सर्वांनी स्वबळाचा आग्रह धरला असून, हा इतिवृत्तान्त प्रदेश समितीसमोर ठेवला जाईल. पालिकांच्या निवडणुकीत लोकांची साथ मिळण्याबरोबरच भाजप कार्यकर्ता कुठेही कमी पडणार नसल्याचा दावा बागडी यांनी केला.