Girish Mahajan BJP Worli Protest Woman Viral Video Reaction: संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यामुळे भाजपाने देशभरात विरोधकांविरोधात मोर्चे, निदर्शने केली. मुंबईतील वरळी येथे भाजपाने काढलेला मोर्चा एका महिलेमुळे चांगलाच गाजला. दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या भागात मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याबद्दल एका महिलेने जोरदार त्रागा केला. भाजपाचे पदाधिकारी, पोलीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनाही महिलेने खडे बोल सुनावले होते. आता या महिलेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एका व्हिडीओ संदेशाद्वारे त्यादिवशी काय झाले? ही महिला कोण? तिची पार्श्वभूमी काय? याबद्दलची सर्व माहिती समोर आली आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दलही या महिलेने टिप्पणी केली आहे.
(सदर व्हिडीओ खाली पाहण्यास मिळेल)
एएनआय वृत्तसंस्थेने या महिलेच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर केला आहे. “तुम्ही काही दिवसांपूर्वी (२१ एप्रिल) काळी टोपी घातलेल्या एका महिलेचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. महिला मोर्चात ती वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारत होती. ती महिला मीच आहे. माझे नाव टीना चौधरी असून काही गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यासाठी मी हा व्हिडीओ करत आहे”, अशी सुरुवात करत सदर महिलेने सर्व घटनाक्रम सांगितला.
“त्या घटनेनंतर माझ्याविषयी काळजी व्यक्त करणारे अनेक मेसेजेस मला आले. मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी ठीक आहे. तुम्ही जी काळजी व्यक्त केली, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. त्यादिवशी (२१ एप्रिल) मी माझ्या मुलीला ४ वाजता म्युझिक क्लाससाठी सोडले. तिला परत आणण्यासाठी मी ४:४५ घरातून निघाले. पण मोर्चामुळे मी वाहतूक कोंडीत अडकले. जवळपास २५ मिनिटे मी गाडीतच होते. गाडी हलत नसल्यामुळे मी बाहेर येऊन काय चालले आहे, हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा कळले की, आमच्या पुढे उभ्या असलेल्या बस पार्किंग केल्या होत्या. त्या तिथून हलतच नव्हत्या”, अशी सुरुवातीची माहिती चौधरी यांनी दिली.
टिना चौधरी काय म्हणाल्या? पाहा व्हिडीओ
#WATCH | Teena Choudhry, the woman seen in the viral video wearing a black cap, confronting Maharashtra Minister Girish Mahajan over a traffic jam, releases a statement detailing her side of the story
— ANI (@ANI) May 2, 2026
She says, "I have received so many messages regarding my safety. I want to let… pic.twitter.com/tcRLP3Gxqf
‘म्हणून मी बाटली फेकली’
टीना चौधरी पुढे म्हणाल्या, “पुढचा अर्धा तास मी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला जाऊन त्या बस काढण्यासंदर्भात विनंती करत होते. पण कुणीही मला दाद देत नव्हते. कुणी माझे ऐकतही नव्हते. मी जी बाटली फेकली ती कुणा मोर्चेकरी किंवा पोलिसावर फेकली नाही. तर फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी ती कृती केली. कारण मी रस्त्याच्या पलीकडे उभी होते आणि माझ्या कमरेपर्यंत दुभाजक होता.”
माझे कुटुंब लष्करी पार्श्वभूमीचे…
टीना चौधरी यांनी पोलिसांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्या म्हणाल्या, “माझे आजोबा आणि वडील भारतीय सैन्यदलात होते. त्यांनी देशासाठी दोन युद्ध लढली आहेत. माझ्या कुटुंबातील एकूण ८ जणांनी भारतीय सैन्यदलात सेवा दिली आहे. मी ‘सेवा’ या शब्दावर जोर देते. कारण तुम्ही जेव्हा गणवेश परिधान करता तेव्हा तुम्ही जनतेचे सेवक असता. गणवेश घातला म्हणजे तुम्हाला एखाद्याचा अवमान करण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार मिळत नाही.”
गिरीश महाजनांबद्दल काय म्हणाल्या?
गिरीश महाजन यांच्याबद्दलचा उल्लेख करताना टीना चौधरी म्हणाल्या, महाजन यांच्याजवळ मी पोहोचले. तेव्हा सव्वा सहा वाजले होते. माझ्या मुलीपर्यंत मी कसे पोहोचणार? हाच प्रश्न माझ्या डोक्यात होता. यावेळी त्या मोर्चात महाजन असे एकच व्यक्ती होते, ज्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी पोलिसांना सूचना देऊन त्या बस बाजूला सारण्याचे निर्देश दिले. बस बाजूला झाल्यानंतर आम्ही आमची वाहने मागे घेऊन इतर मार्गाने प्रवास केला.
माझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नका
२१ एप्रिलचा घटनाक्रम सांगून झाल्यावर टीना चौधरी यांनी सर्वच राजकीय पक्षांना सुनावले आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणत्याही पक्षाने त्यांची राजकीय पोळी भाजू नये, असे त्या म्हणाल्या. तुम्ही सर्वच राजकीय पक्ष एकसारखेच असून तुम्ही सर्वच असल्या प्रकारच्या गोष्टी करता आणि सामान्य माणसाला वेठीस धरता.
याचबरोबर माझ्यासाठी अनेक संदेश येत आहेत. नागरी प्रश्नांच्या संदर्भात मी पीडित जनतेचा आवाज होऊन पुढे यावे, अशी काही लोकांची इच्छा आहे. पण मीच का तुमचा आवाज बनावे. तुम्हाला स्वतःचा आवाज नाहीये का? असा प्रश्न टीना चौधरी यांनी उपस्थित केला.
