वाळू तस्करांची वाहने सोडण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनी केल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता’ ने उघडकीस आणल्यानंतर त्याच्या राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसने या प्रकरणी बावनकुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, हा प्रकार गंभीर आहे. वाळू तस्करीच्या प्रकाराला मंत्र्यांकडून प्रोत्साहन मिळणे दुर्दैवी आहे.  पारदर्शी प्रशासन देण्याचा नारा देत भाजपने सत्ता मिळविली होती. आता त्यांचा खरा चेहरा पुढे आला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी. ते जर नेहमीप्रमाणे शांत बसत असतील तर काँग्रेस तसे होऊ देणार नाही. या प्रकरणी सरकारने चौकशी करून कारवाई करावी.
या प्रकरणाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबत माहिती घेऊ आणि चौकशी करू, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या प्रकरणी बोलणे टाळले. काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते प्रकरण स्थानिक आहे, असे सांगून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.